Maharashtra Cabinet Expansion : भाजपच्या प्रदेशाध्यक्ष कोण? ‘हे’ नाव आहे आघाडीवर

| Updated on: Dec 15, 2024 | 12:48 PM

ते देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी आहेत. त्यांनी गेल्या तीन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. आता सलग चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले.

Maharashtra Cabinet Expansion : भाजपच्या प्रदेशाध्यक्ष कोण? हे नाव आहे आघाडीवर
चंद्रशेखर बावनकुळे
Follow us on

Maharashtra Cabinet Expansion : महायुती सरकारमधील नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. नागपुरातील राजभवनात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असून आज संध्याकाळी ४ वाजता हा सोहळा होईल. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप या तिन्ही पक्षातील मंत्री शपथ घेतील. तब्बल ३३ वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असल्याने जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात आज साधारण ३० ते ३५ आमदार मंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. आतापर्यंत भाजपच्या १० ते १२ नेत्यांना फोन करण्यात आला आहे. त्यातच आता एक महत्त्वाची घडामोड पाहायला मिळत आहे.

भाजपकडून धक्कातंत्राचा वापर

भाजपकडून पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरण्यात येणार आहे. माजी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांना मंत्रि‍पदाऐवजी पक्षात एक मोठी संधी दिली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी रविंद्र चव्हाण यांनी अमित शाहांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांना यापुढे पक्षात त्यांच्यावर कोणती जबाबदारी असेल याबद्दलची माहिती देण्यात आली. यानुसार आता चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर बावकुळे हे देखील आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षपद रिक्त होईल. त्यात रविंद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी आहेत. त्यांनी गेल्या तीन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. आता सलग चौथ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले. विशेष म्हणजे ठाणे आणि कोकणात त्यांनी महाविकासआघाडीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची नवीन जबाबादारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रविंद्र चव्हाण यांचा अल्पपरिचय

रविंद्र चव्हाण हे २००७ मध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 2007 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असतानाही भाजप नगरसेवक असूनही स्थायी समितीचे सभापती झाले. 2009 मध्ये तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून रविंद्र चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांनी तो विश्वास खरा करुन दाखवला. ते २००९ मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार म्हणून त्यांनी शपथ घेतली.

यानंतर 2015-16 मध्ये कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. तसेच कर्जत, माथेरान, बदलापूरमध्ये भाजपने चांगले यश मिळवले. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले. तसेच ते रायगड, पालघर पालकमंत्रीही होते. यानतंर 2019 मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले. 2021 मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

यानंतर 2021 मध्ये रविंद्र चव्हाणांची कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्याकडे पीडब्ल्यूडी खाते होते. त्यांनी सिंधूदुर्गचे पालकमंत्री म्हणूनही कारभार सांभाळला. यानंतर 2024 मध्ये चौथ्यादा डोंबिवलीतून आमदार झाले. आता त्यांच्या गळ्यात महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडणार आहे.