Maharashtra Cabinet Meeting decisions : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. कॅबिनेटच्या या शेवटच्या बैठकीत धडाधड निर्णय घेण्यात आले आहेत. प्रत्येक आयटीआयमध्ये संविधान मंदिर उभारण्याबरोबरच राज्यातील कौशल्यविकास विद्यापीठाला रतन टाटा यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच राज्यात आगरी समाजाच्या आर्थिक विकासासाठी आगरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन दिल्लीला रवाना झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज कॅबिनेटची महत्त्वाची बैठक पार पडली. ही शिंदे सरकारची शेवटची कॅबिनेट असल्याचं सांगितलं जात आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या निर्णयाची माहिती दिली. राज्यातील कौशल्य विकास विद्यापीठाला स्व. रतन टाटा यांचं नावं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पद्मविभूषण रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असं नामकरण करण्यात आल्याचं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. तसेच राज्यातील सर्व आयटीआयमध्ये संविधान मंदिर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. संविधानाबाबतचा फेक नरेटिव्ह दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
1. मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ पासून अंमलबजावणी. (सार्वजनिक बांधकाम)
2. आगरी समाजासाठी महामंडळ (सामाजिक न्याय)
3. समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम (उच्च व तंत्रशिक्षण)
4. दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता (जलसंपदा)
5. आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता (जलसंपदा)
6. वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता (जलसंपदा विभाग)
7. राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित (महसूल)
8. पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी (महसूल)
9. खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य (महसूल)
10. राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार
11. पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता (नगर विकास)
12. किल्लारीच्या शेतकरी सहकारी साखर कारखान्यास कर्ज परतफेड समान हप्त्यात करण्यास मान्यता (सहकार)
13. अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ (सहकार)
14. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे (वैद्यकीय शिक्षण)
15. खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना (वैद्यकीय शिक्षण)
16. मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा (मराठी भाषा)
17. अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळासाठी अभ्यासगट
18. उमेदसाठी अभ्यासगट (ग्राम विकास)
19. कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव (कौशल्य विकास)
गेल्या काही दिवसांपासून टोल माफीची मागणी होत होती. मला समाधान आहे की लाखो लोकांना याचा फायदा होईल. सर्वांना दिलासा मिळेल. वेळ कमी लागेल. प्रदूषण कमी होईल. लाडकी बहिणप्रमाणे लाडका प्रवाशी योजना आम्ही सुरु केली. हा मास्टरस्ट्रोक आहे. हा निर्णय निवडणुकपुरता नाही. पर्मनंट आहे. चुनावी जुमले काढून त्यांनी निवडणुका जिंकल्या. त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
स्किल विद्यापीठाला रतन टाटांचे नाव दिले आहे. हे डबल ढोलकीवाले लोक आहेत. बाबा सिद्दींकीवर हल्ला करणाऱ्यांना फासावर लटकवू. फास्ट ट्रॅकवर खटला चालवू. इतर राज्यातून येणऱ्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. बांधकाम कामगारांना प्रत्येकी 5 हजार देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणआले.