मुंबई: महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. नागपुरातील राजभवनात दुपारी ४ वाजता नवनिर्वाचित मंत्र्यांनी शपथ घेतली. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातील ३६ आमदारांनी शपथ घेतली. यात भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
राधाकृष्ण विखे-पाटील घराणं हे राजकारणातील मोठं नाव आहे. विखे-पाटील घराण्यातील तिसरी पिढीही आता राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि लौकीक आहे. आमदार राधाकृष्ण विखे-पाटील हे राज्यातील बडे नेते आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जन्म 15 जून 1959 मध्ये झाला. सामाजिक, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात जन्मलेल्या राधाकृष्ण विखे यांना लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू मिळालं होतं. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे राज्यातील पहिले पब्लिक स्कूल प्रवरानगरला सुरू केले. याच पब्लिक स्कूलमध्ये राधाकृष्ण विखे यांना पहिलीत प्रवेश देण्यात आला.
आजोबांच्या आग्रहाखातरच त्यांना वसतिगृहात घालण्यात आलं. तिथूनच राधाकृष्ण विखे त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण झाली. या पब्लिक स्कूलमध्ये त्यांनी इयत्ता अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अकरावीनंतर धुळे, कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना ते सामाजिक कार्याकडे ओढले गेले. कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी संपही केला होता. विखे घराण्याने नगरमध्ये सहकार क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना नगरमध्ये सुरू केला. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला. सहकार, समाजकारण आणि राजकारणात विखे-पाटील घराण्याचं मोठं योगदान आहे.
काँग्रेसमधून राजकीय प्रवास
राधाकृष्ण विखेपाटील यांनी काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली. 1986मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. या काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायी दिंडी काढली.
पहिली निवडणूक
विखे यांच्या राजकारणाची सुरुवात खऱ्या अर्थाने 90च्या दशकात सुरू झाली. त्यांनी 1994मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आजही या मतदारसंघाचे ते निर्विवादपणे प्रतिनिधीत्व करत आहेत.
आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली
राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. वडिलांपाठोपाठ राधाकृष्ण विखे यांनीही आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
इतिहासाची पुनरावृत्ती, पण थोड्या फरकाने
वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही शिवसेनेत प्रवेश करावा लागला होता. या इतिहासाची पुनरावृत्ती 2019मध्ये पाह्यला मिळाली, पण थोड्या फरकाने. आधी वडिलासोबत मुलाला शिवसेनेत जावं लागलं. तर 2019मध्ये मुलासोबत वडिलांना भाजपमध्ये जावं लागलं. 2019मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते असतानाही विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राधाकृष्ण विखे यांनी मुलासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या अर्थाने ही इतिहासाची पुनरावृत्तीच समजली जाते.
महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री
अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कृषीमंत्री झाले होते. 2009 पासून ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. राजीनामा देण्याआधी ते काँग्रेसचे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते होते. अहमदनगरमधील प्रवरा शिक्षण प्रसारक संस्थेचे ते प्रमुख आहेत.
विखे-थोरात संघर्ष
नगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचा संघर्ष सर्वश्रृत आहे. नगरवर पकड ठेवण्यासाठी या दोन्ही नेत्यांमध्ये कायम चुरस राहिली आहे. नगरमध्ये राजीव सातव, हर्षवर्धन पाटील, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचा एक गट आहे. त्यामुळे या गटाचं आणि विखे-पाटील यांच्यातील संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो. त्यातच थोरात यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत. तर विखे घराण्याचं पवारांशी पटत नसल्याने नगरमध्ये हा संघर्ष नेहमीच पाहायला मिळतो.
नगरवरच लक्ष
राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्रातील बडे नेते आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाव पडेल अशी त्यांची राजकीय इमेज नाही. मात्र, नगरच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. विशेष म्हणजे नगरमधील सर्वच नेते नगर जिल्ह्यापुरताच विचार तरत असतात. त्याला कारणही तसंच आहे. नगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे 12 आमदारांची बेगमी करून राज्याच्या राजकारणात उपद्रव्यमूल्य निर्माण करण्याचा प्रत्येक नेत्याचा प्रयत्न असतो.
राजकीय वाऱ्याचा अचूक अंदाज असणाऱ्या राज्यातील मोजक्या नेत्यांपैकी विखे पाटील एक आहेत. त्यांच्या वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. वाजपेयींच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, अवज उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदही भूषविलं. पण शिवसेना-भाजपला घरघर लागल्याचं कळताच बाळासाहेब विखेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राधाकृष्ण विखे यांनीही युतीची सत्ता येत असल्याचं पाहून शिवसेना-भाजपशी चांगले संबंध ठेवले. 2019मध्ये पुन्हा युतीची सत्ता येणार असल्याचं लक्षात येताच आणि भाजपचाच मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाटताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.