Maharashtra Cabinet Minister Swearing-in 2024 : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानतंर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाराष्ट्र सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नागपुरातील राजभवनात हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यातच आता पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे किती मंत्री असणार याची माहिती समोर आली आहे. तसेच गृहमंत्रिपद कोणाकडे असणार यावर सुरु असलेला वादही लवकरच मिटणार असल्याचे दिसत आहे.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात साधारण ३० ते ३२ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. त्यात काही जुने चेहरे तर काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल. विशेष म्हणजे पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टीकोनातूनही या मंत्रिमंडळ विस्तारात आमदारांना स्थान देण्यात येईल.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून भाजपसह महायुतीच्या अनेक बैठका होत आहेत. या बैठकीत कोणाला कोणते खाते मिळणार, कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद दिली जाणार याची चर्चा केली जात आहे. त्यातच दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांना स्थान द्यायला हवे, याबद्दल चर्चा केली.
त्यातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त ४३ सदस्य असू शकतात. यात भाजपला 20-21 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 11-12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9-10 मंत्रीपदे मिळू शकतात. तसेच शिंदे गट आणि भाजप यांच्या गृहखात्यावरुन सुरु असलेला वाद अद्याप मिटलेला नाही, असे बोललं जात आहे. शिंदे गटाने अनेकदा गृहमंत्रीपदाची मागणी केली आहे. मात्र भाजप सरकार हे गृहमंत्रीपद स्वत:कडे ठेवण्यास इच्छुक आहे. त्यामुळे आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात गृहमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज नागपुरात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी देवेंद्र फडणवीस यांनी 22 मंत्र्यांची यादी निश्चित केली आहे. यात नितेश राणे, पंकजा मुंडे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन या नेत्यांची नावे संभाव्य मंत्री म्हणून समोर य़ेत आहेत. यातील काही नेत्यांना नुकतंच मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोनही आल्याचे पाहायला मिळत आहे.