मुंबई | 30 ऑक्टोबर 2023 : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. उपोषण सुरु आहेत. मोर्चे निघत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जालन्यातील अंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. त्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. मराठा आरक्षणाची मागणी अधिक तीव्र होत असतानाच मराठा उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजासाठी निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेत आहेत.
न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात आली आहे. ही समिती मराठा समाजाच्या कुणबी असण्याचे पुरावे एकत्र करत आहे. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत या शिंदे समितीने आज पहिला अहवाल सादर केला. यात 11 हजार 530 मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या असल्याचं या समितीने उपसमितीच्या बैठकीत सांगितलं. या शिंदे समितीकडून 1 कोटी 72 लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. कागदपत्रांच्या पडताळणी केली जात आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. तर काही तरूणांनी मराठा आरक्षणासाठी आपलं जीवन संपवलं. मात्र मराठा तरुणांनी आत्महत्या करू नका. सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठा समाजाला दोन टप्प्यात आरक्षण देण्यात येणार आहे. क्युरेटिव्ह पिटीशन आणि शिंदे समितीच्या मार्गाने आम्ही हे आरक्षण देणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
उद्यापासून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उपसमितीची मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असा निर्णय झाला. उद्यापासून हा निर्णय लागू होईल. उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. कुणबी प्रमाणपत्राची मागणी तुम्ही केली आहे. त्यावर शिंदे समिती चांगलं काम करतेय. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, वैद्यकीय उपचार घ्यावेत, असं आवाहन एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांना केलंय.