Maharashtra CM Oath Taking Ceremony : नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजता मुंबईत येणार? पाहा दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक

| Updated on: Dec 05, 2024 | 11:16 AM

आता नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजता मुंबईत येणार, त्यांचा मुंबई दौरा कसा असणार याची माहिती समोर आली आहे.

Maharashtra CM Oath Taking Ceremony : नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजता मुंबईत येणार? पाहा दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक
Follow us on

Maharashtra CM Oath Taking Ceremony : भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहे. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार आहे. आज गुरुवारी (5 डिसेंबर 2024) मुंबईतील आझाद मैदानावर महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत. आता नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजता मुंबईत येणार, त्यांचा मुंबई दौरा कसा असणार याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संध्याकाळी ४.३० च्या दरम्यान मुंबई विमानतळावर दाखल होतील. यानंतर ते 5.15 च्या सुमारास आझाद मैदानात पोहोचतील. यानंतर देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल. यानंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हे शपथविधी झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी हे रवाना होतील, असे म्हटले जात आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील मुंबईत येणार आहेत. अमित शाह हे दुपारी 3.30 वाजता मुंबईत दाखल होतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्यापूर्वी अमित शाह हे सह्याद्री अतिथीगृहात एक छोटी बैठक घेतली. दुपारी ३.३० नंतर ही बैठक होईल. अमित शहा जवळपास 2 तास सहयाद्री अतिथीगृहात असतील. त्या दरम्यान ते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक करतील. त्यामुळे शपथविधीपूर्वी तिन्ही नेत्यांची अमित शहांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाहतुकीत नेमके बदल काय?

आज ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत. गुरूवारी दुपारी १२ वाजल्यापासून हा कार्यक्रम संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. आझाद मैदान परिसरात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने शपथविधीसाठी येणाऱ्यांनी लोकलचा वापर करावा, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील शपथविधीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सीएसएमटी जंक्शन ) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दरम्यान दोन्ही मार्ग बंद ठेवले जाणार आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी एल. टी. मार्ग, चकाला जंक्शनवरून उजवे वळण – डी. एन. रोड छत्रपती शिवाजी महाराज – जंक्शन (सीएसएमटी जंक्शन) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

तसेच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी महात्मा गांधी मार्गही आवश्यतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी एल.टी. मार्ग चकाला जंक्शनवरून उजवे वळण – डी. एन रोड, सीएसएमटीवरून इच्छितस्थळी मार्गस्थ व्हावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.