आताची सर्वात मोठी अपडेट ! 11 डिसेंबर रोजी मंत्र्याचा शपथविधी, सूत्रं काय? कुणाला किती मंत्रिपदं मिळणार?

| Updated on: Dec 05, 2024 | 1:19 PM

महाराष्ट्रात आजपासून देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील.

आताची सर्वात मोठी अपडेट ! 11 डिसेंबर रोजी मंत्र्याचा शपथविधी, सूत्रं काय? कुणाला किती मंत्रिपदं मिळणार?
Follow us on

Maharashtra Swearing In ceremony : महाराष्ट्रात आजपासून देवेंद्र पर्वाला सुरुवात होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे शपथ घेतील. देवेंद्र फडणवीसांसोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यातच आता मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आझाद मैदानावर फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी पार पडणार आहे. त्यानंतर नव्या फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावेळी ३३ जणांचा शपथविधी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात किती मंत्री असणार?

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोललं जात आहे. यात राष्ट्रवादीचे 8 नेते, शिवसेना शिंदे गटातील 10 नेते आणि भाजपचे 15 नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. यानुसार फडणवीसांच्या नवीन मंत्रीमंडळात दोन उपमुख्यमंत्र्‍यांसह ३३ जणांचा समावेश असेल, असे म्हटलं जात आहे.

कोणाला किती खाती मिळणार याबद्दल चर्चा

त्यातच आता शिवसेनेचे नेते आणि आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले आहे. “आज एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. पंतप्रधानांचा वेळ कमी मिळाल्याने तिघांचा शपथविधी होईल. कोणाला किती खाती मिळतील, याबाबत चर्चा होईल. एकनाथ शिंदे हे योग्य खाती पक्षाकडे घेतील. प्रत्येक पक्ष आपपल्या पद्धतीने मागणी करतील. एकनाथ शिंदेंनी जे मागितलंय त्यावर दुपारपर्यंत निर्णय होईल. भविष्यात काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी काही निर्णय सावकाश घेतले जातील”, असे भरत गोगावले म्हणाले.

११ तारखेला बाकीचे शपथविधी होतील

“संजय राऊतने बोलतच राहावं. ते जेवढे बोलतात तेवढा आमचा फायदा झाला. विरोधकांना निमंत्रण दिल आहे. यायचं की नाही ते त्यांनी ठरवावं. चर्चेअंती हा तिढा सुटेल यावेळी आम्हाला संधी मिळेल. आपले सवंगडी सत्तेत आले तर पक्षाचा फायदा नक्की होईल. नाराजी संपली म्हणूनच राज्यपालांना स्वत: जाऊन पाठिंबा दर्शवला आहे. सरकारने केलेली कामे लाडक्या बहिणीची साथ त्यातून हे साध्य झालं. आज तिघांचा शपथविधी झाला. त्यानंतर ११ तारखेला बाकीचे शपथविधी होईल”, असे भरत गोगावले यांनी म्हटले.