थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात मृत्यू? नागपुरातल्या 2 मृतदेहांचा अहवाल काय?

| Updated on: Jan 07, 2023 | 4:04 PM

नागपूर शहरातील मोरभवनजवळ 70 वर्षीय व्यक्ती तसेच गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत 34 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय.

थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्रात मृत्यू? नागपुरातल्या 2 मृतदेहांचा अहवाल काय?
Image Credit source: social media
Follow us on

गजानन उमाटे, नागपूरः राज्यातील विविध शहरांमध्ये आजही कडाक्याची थंडी  (Cold Wave)आणि गार वाऱ्यांचे सत्र सुरुच आहे. याच मालिकेत नागपुरातून (Nagpur) मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरात दोन व्यक्तींचे मृतदेह (Dead body) आढळले असून हे थंडीचे बळी असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येतेय. मागील दोन दिवसात दोन अनोळखी व्यक्तींचे मृतदेह सापडले आहेत. थंडी सहन न झाल्यामुळे या दोहोंचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

नागपूर शहरातील मोरभवनजवळ 70 वर्षीय व्यक्ती तसेच गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत 34 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. हे दोन्ही जण कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपले असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्याही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समोर येईल.

उत्तर प्रदेशात 25 जणांचा मृत्यू

उत्तर भारतात राजधानी दिल्लीसह विविध राज्यांमध्ये थंडीचा प्रकोप पहायला मिळतोय. उत्तर प्रदेशात तर कालपर्यंत तब्बल 25 जणांचा मृत्यू थंडीमुळे झाल्याची घटना समोर आली आहे. अति थंडीमुळे हृदयविकार तसेच पक्षाघाताचा त्रास होऊन 25 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

जास्त थंडीत मृत्यू का होतात?

मानवी शरीराला अति थंडी सहन होत नाही. थंडी सहन न झाल्यास मृत्यूचीही शक्यता असते. हृदयविकार तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या दिवसात हृदय तसेच मेंदू यांच्या क्रियेवर परिाण होण्याची शक्यता असते. तसेच अतिशय कडाक्याची थंडी असल्यास रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या होतात. तसेच रक्तदाब वाढून लोकांना हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. अशी स्थिती उद्भवल्यास मृत्यूचीही शक्यता असते.