नवी दिल्ली | 20 मार्च 2024 : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस महाराष्ट्रात तब्बल 18 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे आजच्या बैठकीत या 18 उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. यापैकी काही उमेदवार निश्चित झाले आहेत. काँग्रेसच्या या लोकसभा उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. या यादीतून अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे पुण्यात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार राहील? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण आता काँग्रेसच्या यादीत पुण्याच्या उमेदवाराचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातून प्रणिती शिंदे, पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून के. सी. पाडवी यांचे चिरंजीव, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिल्याचं निश्चित झालं आहे. कोल्हापुरात शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत यादी उद्या किंवा परवा जाहीर करण्यात येणार आहे. या यादीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. पण त्याआधी काही निश्चित झालेल्या उमेदवारांची नावे ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहेत.
महाविकास आघाडीची मुंबईत उद्या सकाळी दहा वाजता एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सोडवण्यात येणार आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीतील बैठकीनंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आता फार काही वाद राहिलेला नाही. दोन किंवा तीन जागांच्या संदर्भात चर्चा सुरु आहे. त्याबाबत अंतिम निर्णय बाकी आहे. याबाबत उद्या सकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.