मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी नवा उच्चांक गाठला आहे. अनलॉकनंतर वाढलेली गर्दी आणि लोकांनी कोरोना नियमाचे पालन न केल्याने ही संख्या पुन्हा वाढली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याची शक्यता पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी कोरोना रुग्ण वाढत आहेत. (Maharashtra Corona Report Update)
मुंबईत काल दिवसभरात 2877 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 52 हजार 851 इतकी झाली आहे. तर काल मुंबईत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत तब्बल 11 हजार 559 जणांना कोरोनामुळे प्राण गमावावा लागला आहे. तसेच मुंबईतील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 3 लाख 23 हजार 230 इतकी आहे. मुंबईत सद्यस्थितीत 17 हजार 153 कोरोना रुग्ण आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून चाचण्या वाढवण्याकडे विशेष लक्ष दिलं जातं आहे. मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर अँटिजेन चाचण्या होणार आहेत. मुंबईतील 25 प्रमुख मॉलमध्ये प्रत्येक ग्राहकाची अँटिजेन चाचणी केली जाणार आहे. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानतंरच त्यांना मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. तसेच मुंबईतील खाऊ गल्लीचा स्टाफ आणि मुंबईतील रेस्टॉरंटच्या स्टाफची कोविड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
मुंबईतील बाहेरगावच्या रेल्वे येणारे 7 मुख्य रेल्वे स्थानकातही प्रवाशांच्या चाचण्या केल्या जाणार आहे. यात वांद्रे, दादर, बॉम्बे सेंट्रल, सीएसएमटी, कुर्ला, अंधेरी, बोरिवली या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर दर दिवसाला प्रत्येकी किमान 1 हजार प्रवाशांच्या चाचण्या होणार आहे. विशेषत: विदर्भातून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाचं विशेष लक्ष असणार आहे. मुंबईतील मुख्य बस स्थानक दादर, परळ येथे दररोज 1 हजार प्रवाशांच्या चाचण्या होणार आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष आहे. सध्या मुंबईत दिवसाला 20 ते 23 हजार चाचण्या केल्या जात आहे.
दरम्यान मुंबईतील कोरोनाचा हॉट्स्पॉट ठरलेल्या धारावीतही लसीकरणाचा वेग वाढण्यात येणार आहे. धारावीतील करोना आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने प्रयत्न केले होते. यानंतर जगभरात ‘धारावी मॉडेल’ म्हणून याची ओळख झाली. याच धारावीत आता लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी नवे प्रारूप तयार करण्यात येत आहे.
धारावीसाठी सोमवारपासून स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू होणार आहे. यानुसार धारावीत एकाच दिवशी हजार नागरिकांना लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी धारावीकरांना अॅपवर नोंदणीसाठी आणि डॉक्टरांच्या प्रमाणपत्रासाठी मदत करण्याकरिता खासगी डॉक्टरांची आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
नाशिकमधील कोरोनाची स्थिती काय?
नाशिक शहरात काल दिवसभरात 746 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर नाशिक महानगरपालिकेत 1 हजार 675 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे नाशिकमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 44 हजार 516 इतकी झाली आहे. तर काल नाशिकमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशकात तब्बल 2 हजार 109 जणांना कोरोनामुळे प्राण गमावावा लागला आहे. तसेच नाशकातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 31 हजार 370
इतकी आहे. नाशिकमध्ये सद्यस्थितीत 11 हजार 037 कोरोना रुग्ण आहेत.
नाशिकमधील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता नांदगावपाठोपाठ मनमाडमध्ये ही तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. उद्या शनिवारपासून सोमवारपर्यंत जनता कर्फ्यू राहणार आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदने जनता कर्फ्यू घोषित केला आहे. जनता कर्फ्यूत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्व आस्थापने बंद राहणार आहे. जनता कर्फ्यूदरम्यान नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपुरात कोरोना रुग्णांचा स्फोट
नागपुरात काल पुन्हा एकदा कोरोनाचा ब्लास्ट झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात तब्बल 3 हजार 796 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात काल कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 1 हजार 277 रुग्ण पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. नागपुरातील एकूण रुग्णसंख्येचा आढावा घेतला तर 1लाख 82 हजार 552 रुग्ण आतापर्यंत आढळून आले. त्यातील 1लाख 54 हजार 410 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले. तर आतापर्यंत 4 हजार 528 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नागपुरात गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या घरावर स्टिकर
या पार्श्वभूमीवर नागपुरात गृहविलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या घरावर स्टिकर लावण्यात येणार आहे. गृहविलगीकरणात असलेले कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेच्या दहा झोन कार्यालयाअंतर्गत गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या घरावर “स्टीकर” लावणे सुरु केले आहे. मनपा आयुक्त यांच्या निर्देशानुसार स्टीकर लावण्यात येत आहे.
या स्टिकरवर “पॉझिटिव्ह कोव्हिड – 19 रुग्ण होम आयसोलेशन” असे नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये रुग्णाचे नाव आणि होम आयसोलेशनचा कालावधी सुध्दा त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. नागपूर शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता गृह विलगीकरणातील रुग्णांनी नियमांचे पालन करावे याबाबत मनपाद्वारे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह असूनही रस्त्यावर फिरणाऱ्या रुग्णांना 5 हजाराचा दंड ठोठावत महापालिका आयुक्तांनी दणका दिला आहे. नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गृह विलगीकर नियमांचे पालन न करणाऱ्या एका कोरोनाबाधित रुग्णाला 5 हजाराचा दंड केलाय. हा रुग्ण घराबाहेर फिरत होता.
परभणीत नाईट कर्फ्यू
महाराष्ट्र एस.टी गाड्यांना कर्नाटकात प्रवेश बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एस.टी गाड्यांना कर्नाटकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र एस.टीच्या फेऱ्या कागवाड सीमेपर्यंत सुरु ठेवण्यात आल्या आहेत. तर सांगलीहून जमखंडीला जाणाऱ्या 2 बसेस आज एस टी प्रशासनाने रद्द केल्या आहेत. (Maharashtra Corona Report Update)
मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे मीरा भाईंदर मनपा प्रशासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 मार्चपर्यंत मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊन असणार आहे. 31 मार्चच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. मीरा भाईंदर क्षेत्रामधील हॉटस्पॉट क्षेत्रामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असले तरी हॉटस्पॉट क्षेत्राबाहेर हा नियम लागू नसेल.
हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट क्षेत्राबाहर सर्व हॉटल्स, रेस्टॉरंट, बार, हॉल आणि फूड कोर्ट इत्यादी ठिकाण्याच्या सेवा 50% क्षमतेसह सुर राहतील. तसेच, मॉलसहित सर्व प्रकारची दुकाने रात्री 11.00 वाजेपर्यंतच सुरू राहतील
अंबाबाई आणि जोतिबा मंदिर दर्शनाच्या वेळेत बदल
वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासनी श्री. अंबाबाई, जोतिबा मंदिरासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व मंदिराच्या दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर इथून पुढे सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत भक्तांसाठी खुलं असणार आहे. यापूर्वी अंबाबाई देवीच दर्शन करता येणार आहे. यापूर्वी सकाळी 7 ते 12 आणि दुपारी 3 ते रात्री 8 अशी दर्शनची वेळ होती. यापुढे मात्र संध्याकाळी सहानंतर हे मंदिर महिलांसाठी बंद असणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने धार्मिक स्थळांच्या समिती प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.
पुणे जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतच 5 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात पुणे शहरातील रुग्णसंख्या 2 हजार 500 पेक्षा जास्त होती. तर पिंपरी-चिंचवड मध्ये जवळपास 1 हजार 200 रुग्ण सापडले होते. त्यामुळे आता पुण्यातील कोरोना पाझिटिव्हिटीचा दर 25 टक्क्यांच्या पुढे जाऊन पोहोचला आहे. रात्रीपर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान बुधवारी एकाच दिवसांत 2 हजार 587 अशी उच्चांकी रुग्णसंख्या आढळून आली होती.
सांगली जिल्ह्यात काल दिवसभरात 76 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल 40 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात 500 हून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
नांदेडमध्ये गेल्या 24 तासांत 625 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. हा जिल्ह्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आता 3 हजार 728 वर पोहोचली आहे. काल दिवसभरात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 627 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 51 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
वाशिम जिल्ह्यात काल दिवसभरात 203 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 117 जण कोरोनातून मुक्त झालेत. जिल्ह्यात काल 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. जिल्ह्यात गेल्या 22 दिवसांत 4 हजार 71 कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या जिल्ह्यात 1 हजार 440 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. (Maharashtra Corona Report Update)
संबंधित बातम्या :
Mumbai Corona | मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेचा मास्टर प्लॅन, मॉल्स, रेल्वे स्थानकांवर चाचण्या
मुंबईत कोरोनाचा उच्चांक; आतापर्यंतची सर्वाधिक 2877 रुग्णांची नोंद