मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाला वर्षपूर्ती झालीय. अशा स्थितीत महाराष्ट्रभर कोरोनाची दुसरी लाट येतेय की काय अशी भिती व्यक्त केली जातेय. प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. त्यामुळेच तज्ज्ञांनी देखील महाराष्ट्रातील परिस्थिती धोकादायक वळणावर असल्याची निरिक्षणं नोंदवली आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकासआघाडी सरकार आगामी काळात कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत असल्याचं समोर येतंय (Maharashtra Corona Updates 8 March 2021 Thackeray Government on strict restriction).
विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या याआधीच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधताना राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही हा प्रश्न थेट जनतेलाच विचारला होता. तसेच आगामी काळात लॉकडाऊन नको असेल तर मास्क वापरत कोरोना नियमांचं पालन करा, लॉकडाऊन हवा असेल तर मास्क न घालता नियमांचं उल्लंघन करा, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानंतरही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने आता राज्य सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई
राज्याची राजधानी मुंबईत 7 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या 10 हजार 731 इतकी आहे. याशिवाय 24 तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 20 आहे. आजवर बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3 लाख 10 हजार 451 आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर 93 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर 231 दिवस आहे. तसेच कोविड वाढीचा दर (28 फेब्रुवारी-6 मार्च) 0.30 टक्के आहे.
पुणे
पुणे शहरात कोरोना संसर्गाचा विळखा पुन्हा घट्ट होण्यास सुरुवात झालीय. रविवारी (7 मार्च) पुण्यात नव्याने 984 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 08 हजार 330 इतकी झालीय. दुसरीकडे पुणे महापालिका हद्दीत नव्याने 5 कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झालेत. यासह आता मृतांची एकूण संख्या 4 हजार 890 इतकी झाली आहे. रविवारी दिवससभरात एकूण 750 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.
शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालल्याने नागरिकांवर उपचार करण्यासाठी पुणे महापालिका कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार आहे. दळवी रुग्णालय आणि रक्षक नगर स्टेडीयम येथील कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. मंगळवारपासून हे दोन्ही केंद्र कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाची तयारी झालीय.
पुण्यात कोरोनाचा उद्रेक वाढल्याने रुग्णालयांसह, वसतिगृहांमध्ये उपचार केंद्र व विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, रुग्णांची संख्या कमी होत गेल्याने ते केंद्र बंद करून कोरोना बाधितांना त्यांच्या घरातच विलगीकरण करण्यावर भर देण्यात आला. रुग्ण संख्या वाढत असल्याने मायक्रो कंटेनमेंट झोन तयार करण्यासही सुरवात झालीय.
पुणेकरांना विनामास्क कारवाईचीही फिकीर नाही?
गेल्या 10 दिवसात पुण्यात 12 हजार 357 जणांवर विनामास्कची कारवाई करण्यात आली. 10 दिवसात 87 लाख 11 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. आतापर्यंत पुणे पोलिसांकडून 11 कोटी 63 लाख 5 हजाराचा दंड वसूल करण्यात आलाय. विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. त्यामुळेच शहरात कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. पुणे शहरात आतापर्यंत 2 लाख 40 हजार नागरिकांवर विनामास्कची कारवाई झालीय.
औरंगाबाद
औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात 426 कोरोना रुग्णांची वाढ झालीय. यासह एकूण रुग्णांचा आकडा 52 हजार 969 वर पोहचलाय. सध्या रुग्णालयात 3 हजार 218 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 48 हजार 459 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलाय. दुसरीकडे औरंगाबादमध्ये कोरोनाने 1 हजार 292 रुग्णांचा बळी घेतलाय.
नागपूर
नागपूर महानगरपालिकेच्या दिव्याखाली अंधार असल्याची परिस्थिती आहे. नागपूरात रोज 1000 ते 1200 कोरोना रुग्णांची वाढ होतेय. त्यातच नागपूर मनपाचे सहाय्यक आयुक्तच विनामास्क फिरत असल्याचं समोर आलंय. सहाय्यक आयुक्त अशोक पाटील गर्दीतही विनामास्क वावरताना दिसत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. बडकस चौकात इमारतींवरील कारवाई दरम्यान ते विनामास्क फिरत असल्याचं नुकतंच दिसलं. मास्क न घालण्याचं कारण विचारल्यावर त्यांनी हास्यास्पद उत्तर दिलं. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असाच प्रश्न आहे. सर्वसामान्यांवर कारवाई करणारी मनपा आता गप्प का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.
महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
हेही वाचा :
राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोना लस, शर्मिला ठाकरेंची उपस्थिती
रिन्यू पॉवरचा मोठा निर्णय! 7500 लोकांच्या लसीकरणाचा खर्च कंपनी उचलणार
ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी प्राधान्य द्या, सुप्रीम कोर्टाचे खासगी रुग्णालयांना निर्देश
व्हिडीओ पाहा :
Maharashtra Corona Updates 8 March 2021 Thackeray Government on strict restriction