राज्यात काँग्रेसचं सरकार होतं, ठाकरेंचा उल्लेख टाळला; निर्मला सीतारामण यांनीही दिला ‘तो’ नारा

| Updated on: Dec 04, 2024 | 12:53 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्पष्ट विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. निर्मला सीतारमण यांनी भाजपच्या विजयाचे कौतुक केले आणि महाविकास आघाडी सरकारावर टीका केली. त्यांनी शेतकरी, उद्योग आणि तरुण स्टार्टअप यांना मदत करण्याची प्रतिज्ञा केली. "एक आहे तर सेफ आहे" या नाऱ्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

राज्यात काँग्रेसचं सरकार होतं, ठाकरेंचा उल्लेख टाळला; निर्मला सीतारामण यांनीही दिला तो नारा
निर्मला सीतारमण, भाजप नेत्या
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 11 दिवस झाल्यानंतर अखेर महायुतीच्या सत्ता स्थापनेचं नाट्य अखेर आज संपुष्टात आला आहे. निवडणुकीत सर्वात जास्त (132) जागा मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली असून त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हजर होते. त्यावेळी गटनेतेपदासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली. गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर एकमताने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदीनिवड झाली आणि एकच जल्लोष झाला.

या बैठकीदरम्यान चंद्रशेखर बावनकुळे, विजय रूपाणी यांच्यासह निर्मला सीतारमण यांनीही मनोगत मांडत उपस्थित नेत्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना निर्मला सीतारमण यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली. तसेच राज्यातील सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होते असे नमूद करत त्यांनी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. तसेच या विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींपासून ते फडणवीसांपर्यंत दिलेल्या ‘एक है तो सेफ है’ च्या या नाऱ्याचा त्यांनी पुनरुच्चार  केला. राज्यातील काँग्रेसच्या काळातील सरकारमध्ये जनतेचं कसं नुकसान झालं हे लोकांना दाखवून आपल्याला पुढे जायचं आहे, काँग्रेसचं सरकार आलं नसतं तर बुलेट ट्रेन सुरू झाली असती असे म्हणत त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या अडीच वर्षांतील काराभारावर टीका केली.

राज्यात काँग्रेसचं सरकार होतं असा वारंवार केलेला उल्लेख आणि शिवसेना पक्षप्रमुख तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करणं निर्मला सीतारमण यांनी टाळल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून भाजप- शिवसेना ठाकरे गट यांच्यातील हे युद्ध आणखीनच पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हणाल्या निर्मला सीतारमण ?

राज्यातील 14 कोटी जनता जनार्दनाचा निर्णय भारतासाठी एक संदेश आहे. ही काही नेहमीची विधानसभेची निवडणूक नव्हती तर हा लोकसभा निवडणकीनंतर लागलेला निकाल आहे. महाराष्ट्रात मिळालेला हा विजय अनपेक्षित होता. हा देशासाठी मोठा संदेश आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकार राज्यात होतं, मात्र त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या कामात व्यत्यत आला होता. त्यामुळे लोक वैतागले होते. त्यामुळे राज्यात काय चाललंय असं लोकांच्या मनात होतं. त्यामुळेच त्यांनी हा कौल दिला असं सीतारमण म्हणाल्या. जनतेने दिलेला हा कौल ओळखून तुम्ही योग्य पद्धतीने पुढे न्याल. डबल इंजिनचं सरकार मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या भविष्यासाठी पुढे न्याल. निवडणुकीतील घोषणा तुम्ही पूर्ण कराल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील काँग्रेसच्या काळातील सरकारमध्ये जनतेचं कसं नुकसान झालं हे लोकांना दाखवून आपल्याला पुढे जायचं आहे. शेतकरी, उद्योग आणि कोणत्याही क्षेत्रातील कामे असतील ती पुढे न्यायची आहे. एआयमध्ये आपले तरुण स्टार्टअपसाठी मोठं योगदान देत आहेत. त्यांना महाराष्ट्रात आणखी प्रोत्साहन मिळालं पाहिजे असंही निर्मला सीतारमण यांनी नमूद केलं.

महाराष्ट्राचं स्थान परत मिळवून द्यायचयं

मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे स्टार्टअपमध्ये आपण मोठं योगदान देऊ शकतो. महाराष्ट्राचं स्थान आपल्याला परत मिळवून द्यायचं आहे. आषाढी एकादशीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी कॉरिडोअर बनवण्यात आलं. मोदींच्या व्हिजनमुळे शक्य झाल्यांच निर्मला सीतारमण यांनी नमूद केलं. महाराष्ट्रातील एक निर्णय ५० वर्षात झाला नाही. पण केवळ मोदींमुळे वाढवण बंदर तयार करण्यात आलं आहे. हा सामान्य निर्णय नव्हता. केंद्रात मोदींचे सरकार महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी अनेक योजना घेऊन येत आहे. बुलेट ट्रेनची व्यवस्था आपणच करतोय. काँग्रेसचं सरकार आलं नसतं तर बुलेट ट्रेन सुरू झाली असती अशी टीका सीतारमण यांनी केली.

जापान आपल्याला आर्थिक सहकार्य करत आहे. मेट्रोचं काम सुरू आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. जनतेने हे सर्व पाहिलं आहे. त्यामुळेच आपल्याला मोठं मँटेड दिलं आहे. मुंबईचं आग्रणी स्थान परत आणण्याचं काम आपण करणार आहोत. नाशिक आणि आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार आहोत. कांद्यासाठी आपण गोडाऊन तयार करणार आहोत. महाराष्ट्राचं स्थान परत मिळवून द्यायचयं असा त्यां म्हणाल्या.

संपूर्ण विधानसभा निवडणुकीत गाजलेला, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला एक आहोत तर सेफ आहोत हा नाराही निर्मला सीतारमण यांनी पुन्हा दिला.