ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकारणात मोठे भूकंप होत आहेत. अनेक नेते इकडून तिकडे जात पक्षांतर करत आहेत. मात्र, आता तिकीट मिळवण्यासाठी राजकीय घराण्यांमध्येही फूट पडताना दिसत आहे. अजितदादा गटाचे नेते धर्मराव बाबा अत्राम यांची कन्या शरद पवार गटात गेली. त्यानंतर शरद पवार गटाचे नेते राजेंद्र शिंगणे यांची पुतणी अजितदादा गटात गेली. घरातील या दोन फुटी ताज्या असतानाच आता नाईक घराण्यातही फूट पडली आहे. भाजप नेते गणेश नाईक यांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आहे. त्यामुळे नवी मुंबईत मोठा राजकीय भूकंप झाला असून भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
भाजपने पहिली यादी जाहीर केली. त्यात गणेश नाईक यांना उमेदवारी जाहीर केली. पण संदीप नाईक यांना बेलापूरमधून उमेदवारी देण्यात आली नाही. संदीप नाईक यांना बेलापूरमधून उमेदवारी मिळावी म्हणून गणेश नाईक यांनी मोठी फिल्डिंग लावली होती. पण एका घरात एकच तिकीट देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे भाजपने संदीप नाईक यांना तिकीट नाकारल्याचं सांगितलं जात आहे. संदीप नाईक हे शरद पवार गटात आल्याने नाईक कुटुंब आता दोन पक्षात विभागलं गेलं आहे. वडील भाजपमध्ये तर मुलगा शरद पवार गटात अशी स्थिती नवी मुंबईकर अनुभवत आहेत. त्यामुळे महायुतीला मतदान करायचं की महाविकास आघाडीला? याचा संभ्रमही नवी मुंबईकरांमध्ये होण्याची शक्यता आहे.
तेव्हा मदत केली
शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत संदीप नाईक यांनी तुतारी हाती घेतली. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. 2019मध्ये मी निवडणूक लढलो नाही. पण बेलापूरमध्ये आम्ही मदत केली. मात्र कार्यकर्त्यांनी आज निर्धार मेळावा घेतला. आज मी शरद पवार गटात प्रवेश केलाय, असं संदीप नाईक म्हणाले.
नाईक यांचा प्रचार नाही
मी आजपासून शरद पवार यांच्यासोबत आहे. जेव्हा यादी जाहीर होईल. नाव जाहीर होईल, तेव्हाच मी निवडणूक प्रचारात उतरणार आहे. 2019 साली आम्हाला मिळालेली वागणूक आणि पक्षाकडून न मिळालेली साथ यामुळे मी निवडणूक लढत आहे, असं सांगतनाच गणेश नाईक यांचा निवडणूक प्रचार करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आम्हीच संदीप नाईक यांना संपर्क केला
दरम्यान, जयंत पाटील यांनीही संदीप नाईक यांचं पक्षात स्वागत केलं आहे. संदीप नाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही संपर्क केला होता. संदीप नाईक हे बेलापूर विधानसभा मतदारसंघातून लढणार आहेत. संदीप नाईक हे आले. त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही आलो. 2019 ला ते पक्ष सोडून गेले आणि आज संदीप नाईक यांनी त्यांच्या भावना सांगितल्या आहेत. त्यांनी नाही तर मी त्यांना संपर्क केला होता, असं जयंत पाटील म्हणाले.