बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातल्या दोन बड्या पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. तसेच राज्यात महायुतीचं सरकार असतानाच आरक्षणासाठी मराठा समाजाचं मोठं आंदोलन उभं राहिलं ज्याचं नेतृत्व सध्या मनोज जरांगे पाटील करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली होती, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
या आंदोलनाचा फटका हा राज्यातील महायुती सरकारला बसेल असं बोललं जातं होतं, विशेषत: या आंदोलनाची धग ही मराठवाड्यात अधिक बसू शकते असा अंदाज होता, मात्र एक्झिट पोलचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत, ज्यामध्ये मराठावाड्यात महायुती जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीच्या कमी जागा निवडून येतील असा अंदाज आहे.
मराठवाडा क्षेत्रात विधानसभेच्या एकूण 46 जागा आहेत, त्यापैकी तब्बल तीस जागांवर महायुतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. तर 15 जागांवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी होऊ शकतो.अॅक्सिसच्या वतीनं हा एक्झिट पोल करण्यात आला आहे. याचाच अर्थ मराठवाड्यात महायुतीला जास्त जागा मिळताना दिसत आहेत, ही जागांची आकडेवारी महाविकास आघाडीच्या जवळपास दुप्पट आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठं आंदोलन उभारलं. हे आंदोलन जेथून सुरू झालं ते अंतरवाली सराटी हे गाव मराठवाड्यात येते. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय देखील घेतला होता, मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली, मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाचा आणि मराठा समाजात सरकार विरोधात असलेल्या रोषाचा सर्वाधिक फटका हा मराठवाड्यात महायुतीला बसेल असा अंदाज होता, मात्र एक्झिट पोलनुसार मराठवाड्यात महायुतीचे तब्बल 30 उमेदवार निवडून येण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडी 15 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे.