गडचिरोली : आधीच कर्ज… त्यात पावसाची अनिश्चितता. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी तर कधी कोरडा दुष्काळ… यामुळे शेतकरी (Farmer) नेहमीच संकटात सापडतोय. अतिवृष्टीमुळे गडचिरोलीत (Gadchiroli) शेतीचं मोठं नुकसान झालंय. उभी पिकं पाण्याखाली गेली अन् कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याने आत्महत्येचा पर्याय स्विकारला…
अतिवृष्टीमुळे गडचिरोलीत शेतीचं मोठं नुकसान झालंय. गडचिरोली जिल्ह्यात 41,173 हेक्टर जमिनीतील पिकांचं नुकसान झालं आहे. शिवाय चार महिन्यात झालेला अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. 15 नागरिक पुराच्या पाण्यात दगावले. तर चार शेतकऱ्यांची कर्जाला कंटाळून आत्महत्या केलीय.
गडचिरोली तालुक्यातील मुडझा गावात दोन तर एटापल्ली तालुक्यातील मल्लमपाडी गावात एक तर कोरची तालुक्यात काल एका शेतकऱ्याने आत्महत्या केलीय.
या अतिवृष्टीच्या काळात 672 जनावरांचं नुकसान झालंय. पूर वादळामुळे या चार महिन्यात 8330 घरांची पडझड झाली आहे. यात सर्वात जास्त फटका 54 हजार 600 शेतकऱ्यांना बसला आहे.
कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय.
कोरची तालुक्यात काल ज्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्याच्यावर अंतिम संस्कार काल सायंकाळी करण्यात आले. गावात दुःखाचा सावट होता या शेतकऱ्याला दोन मुली एक मुलगा आहे. बँकेचं कर्ज आणि ट्रॅक्टरचं कर्ज परतफेड न करू शकल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली.
पीक नुकसानीनंतर थोडीफार का होईना राज्य सरकारने मदत केली. परंतु जनावरे वाहून गेलेली मदत अद्याप गडचिरोली जिल्ह्यात प्राप्त झालेली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी चामोर्शी भामरागड एटापल्ली मुलचेरा सिरोंचा या तालुक्याला सर्वात जास्त फटका या वर्षी बसला आहे.
मेड्डीगट्टा धरण,अवकाळी पाऊस, पेरणी, पीक कापणे उशिरा, बँकेतून बाहेरून घेतलेले शेतकऱ्यांवर पडलेले कर्जाचे ओळे यातून कसा सावरता येईल, हेच प्रश्न आत्महत्या झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या समोर आहेत.
त्यामुळे लवकरात लवकर सरकारी मदत मिळावी हिच अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.