गडचिरोलीत गंभीर पूरस्थिती; 5 राष्ट्रीय महामार्गांसह 50 रस्ते वाहतुकीसाठी बंद

| Updated on: Jul 25, 2024 | 8:29 PM

Maharashtra Gadchiroli Rain Update : गडचिरोलीतील पूरस्थिती गंभीर झाली आहे. गडचिरोलीत 5 राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. तर 50 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वाचा सविस्तर...

गडचिरोलीत गंभीर पूरस्थिती; 5 राष्ट्रीय महामार्गांसह 50 रस्ते वाहतुकीसाठी बंद
मुसळधार पाऊस
Follow us on

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस होतोय. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आहे. अशात गडचिरोली जिल्ह्यातून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येतेय. गडचिरोली जिल्ह्यातील 50 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढया मोठ्या संख्येत रस्ते बंद झालेले आहेत. यात पाच राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात गंभीर पूर परिस्थिती उद्भवली आहे. गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. यामुळे पुन्हा एकदा अनेक नदी आणि नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात 50 मार्ग बंद झालेले आहेत.

नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

गडचिरोली जिल्ह्यातून कुठेही बाहेर जाता किंवा येता येत नाही, अशी गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती, पाल, कटाणी, पामुलागौतम, पार्लकोटा, दिना या सर्व नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, भामरागड, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, धानोरा, मुलचेरा अनेक तालुक्यात हीच परिस्थिती आहे.

पाच महामार्ग बंद

गडचिरोली चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग, गडचिरोली आरमोरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग, आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग, आलापल्ली सिरोंचा तेलंगाना राष्ट्रीय महामार्ग, गडचिरोली धानोरा छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 5 राष्ट्रीय महामार्गांसह 50 रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याने जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला आहे.

नागरिक अडकले

गडचिरोली सिरोंच्या तालुक्यात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास 200 नागरिक सिरोंचा आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावरील पुसूकपल्ली नाल्याजवळ अडकले आहेत. या भागात सध्या सकाळपासून मुसळधार पाऊस असल्याने पुसकपल्ली नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. जवळपास 40 मोठे वाहने आणि दुचाकी 70 ते 80 वाहने अडकून पडली आहेत गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांचे हाल होत आहेत. सध्या ही पूर परिस्थिती कायमच असून नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे.