मुंबई : काही महिन्यांपूर्वी सांगलीत पावसाने (Sangli Rain) हाहाकार उडवला. पावसामुळे सांगलीतील जनजीवन विस्कळीत झालेलं. अनेक घरांची पडझड झाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. शेतीचं नुकसान झालं. त्यामुळे हजारो शेतकरी हवालदिल झाले. सर्वसामान्य नागरिकरांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे राज्य सरकारकडे नुकसान भरपाईची सातत्याने मागणी केली जात होती. अखेर सर्वसामान्यांची ही हाक अखेर शासनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर हिवाळा निघून गेला. आता उन्हाळा सुरु होत असताना राज्य सरकारकडून सांगलीतील पूरग्रस्त नागरिकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने या पूरग्रस्त नागरिकांसाठी 10 कोटी 73 हजार रुपयांची मदत घोषित केलीय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही नुकसान भरपाई ही गेल्या वर्षाची नाहीय. तर 2019-20 साली झालेल्या नुकसान भरपाईची आहे. अर्थात ही मदत पहिली मदत नसेल. पण राज्य सरकारकडून 2019 सालाच्या नुकसानीची आजही दखल घेतली जातेय हे महत्त्वाचं आहे.
सांगलीत पूरग्रस्त भागात नुकसान झालेल्यांना मदत म्हणून राज्य सरकारकडून 10 कोटी 73 हजार रुपयांची मदत जाहीर झालीय. अतिवृष्टीमुळे सांगतीत मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती. विशेषत: मिरज, वाळवा, पलूस तालुकयात मोठे नुकसान झाले होते.
नागरिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत शासनाकडून पंचनामे जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या तालुक्यातील पंचनामे विहित वेळेत सादर न केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या सूचना ही शासनाकडून देण्यात आल्या आहेत.
तसेच लाभार्थींना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील हा शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची सूचना देण्यात आली आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात दरवर्षी निसर्गाचा कोप होताना दिसतोय. कोल्हापुरातही तीच परिस्थिती आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ झालेली बघायला मिळाली होती. त्यामुळे नागरिकांची धाकधूक वाढली होती.
विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात राज्यात सातत्याने ओला दुष्काळ पडताना बघायला मिळाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना बघायला मिळाल्या आहेत.
पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांमध्ये आतापर्यंत अनेकांचा जीव गेल्याचं बघायला मिळालं आहे. याशिवाय अशा घटनांमुळे प्रशासनाची देखील तारांबळ उडते. तसेच पावसामुळे बचावर कार्यात देखील अडचणी येतात.