मुंबई : महाराष्ट्र कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचीदेखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन (Oxygen) मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात 200 मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा, असं राज्य सरकारने म्हटलं आहे. तसेच लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 10 टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून केली आहे. (Maharashtra government demands 200 Metric Ton extra Oxygen to central government for treatment of Corona patient)
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने ऑक्सिजन, रेमडेसीव्हीर, बेड्स यांचा आढावा घेतला जात आहे. राज्याला वाढीव ऑक्सिजनची गरज असून त्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्याबाबत ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्य सचिव सीतारम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याबाबतचे पत्र पाठवले.
राज्यात सध्या 6 लाख 63 हजार 758 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 78 हजार 884 रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन दिला जातो. 24 पजार 787 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्याचबरोबर राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 16 जिल्ह्यांमध्ये सातत्याने रुग्ण वाढत आहेत. ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडिट केले जात आहे. या ऑडिट नुसार राज्याची ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. याच गोष्टीचा विचार करुन ऑक्सिजन पुरवठ्यात 200 मेट्रिक टनांची वाढ करण्यात यावी तसेच ऑक्सिजन लिफ्टींगची सुविधा राज्याच्या जवळ असावी, असेसुद्धा राज्य सरकारने आपल्या पत्रात म्हटले आहे.
राज्याला सध्या गुजरात जामनगर येथून दिवसाला 125 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होत असू त्यात 100 मेट्रिक टनाने वाढ करून दिवसाला 225 मेट्रिक टन आणि भिलाई येथून 230 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, अशी विनंतीही मुख्य सचिवांनी केली आहे. भौगोलिकदृष्ट्या ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कलावधी कमी होण्यास मदत होतानाच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देण्यासाठी मदत होईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
इतर बातम्या :
तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार, वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू बिनकामाचे; डॉ. गुलेरिया यांचा इशारा
Kolhapur Lockdown | कोल्हापुरात कोरोना रुग्णसंख्या वाढती, पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन
(Maharashtra government demands 200 Metric Ton extra Oxygen to central government for treatment of Corona patient)