Maharashtra Government formation 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आता येत्या 5 डिसेंबरला महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून सध्या याची जय्यत तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. मात्र अद्याप भाजपकडून गटनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता सर्वांचीच नजर याकडे लागली आहे.
भाजपच्या गटनेता निवडीसाठी अजूनही केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपला गटनेता निवडीसाठी आता केंद्रीय निरीक्षकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे सध्या सर्वच नवनिर्वाचित आमदारांचे डोळे केंद्रीय नेत्यांच्या निरोपाकडे लागले आहे. काही दिवसांपूर्वीच नव्या सरकारच्या शपथविधीसाठी पाच डिसेंबरच्या मुहूर्ताची अधिकृत घोषणा करण्यात आली. मात्र भाजपचा विधीमंडळ गटनेता कधी निवडला जाणार, याबाबत कोणतीच ठोस माहिती नवनिर्वाचित आमदारांना नाही.
भाजपच्या विधीमंडळ गटनेता निवडण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत ही बैठक कधी आणि केव्हा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपच्या एकाही आमदाराला अद्याप मुंबईत दाखल होण्याच्या सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे आता गटनेता निवडीसाठी मुंबईत दाखल होण्याचा निरोप कधी मिळणार याकडे भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचे डोळे लागले आहेत.
आज सोमवारी 2 डिसेंबर रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, असे सांगितले जात होते. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून या बैठकीसाठी निरीक्षकांच्या नियुक्तीची कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे आज भाजपच्या विधीमंडळ गटनेता निवडण्याची बैठक आज होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेने भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यानंतर आज भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्याची निवड करण्यासाठी आज २ किंवा उद्या ३ डिसेंबर रोजी बैठक होईल. या बैठकीत विधीमंडळ गटनेत्याच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती समोर आली आहे.
येत्या गुरुवारी 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत याच दिवशी भाजपचे १० ते १५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.