मुख्यमंत्रि‍पदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात, पण शिंदे-अजितदादांची मोठी खेळी, दिल्लीच्या बैठकीत ‘या’ मंत्रि‍पदांची मागणी?

| Updated on: Nov 29, 2024 | 8:58 AM

Eknath Shinde Demand Home Ministry : सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं. यामुळे आता सर्वांचेच लक्ष सरकार कधी स्थापन होणार याकडे लागलं आहे. तसेच मुख्यमंत्रि‍पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलही सतत चर्चा होत आहे. मात्र त्यापूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे […]

मुख्यमंत्रि‍पदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात, पण शिंदे-अजितदादांची मोठी खेळी, दिल्लीच्या बैठकीत या मंत्रि‍पदांची मागणी?
महायुती
Follow us on

Eknath Shinde Demand Home Ministry : सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महायुतीला पूर्ण बहुमत मिळालं. यामुळे आता सर्वांचेच लक्ष सरकार कधी स्थापन होणार याकडे लागलं आहे. तसेच मुख्यमंत्रि‍पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलही सतत चर्चा होत आहे. मात्र त्यापूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे. काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदावर दावा केला आहे. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रिपदाची मागणी केली.

महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदावरुन रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थितीत होते. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच कोणाला कोणती मंत्रिपद दिली जाणार, यावरही चर्चा करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रि‍पदावर दावा केला आहे. तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रिपदाची मागणी केली.

एकनाथ शिंदेंकडून 12 मंत्रि‍पदांची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती पद मिळावे, यासाठीही एकनाथ शिंदे आग्रही आहेत. या मंत्रि‍पदामध्ये गृहखाते, नगरविकास मंत्री यांसह विविध खात्यांचा समावेश आहे. तसेच पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशीही विनंती एकनाथ शिंदेंनी केली आहे. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंना गृह खातं देणार का? याबद्दल चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे अजित पवारांकडून उपमुख्यमंत्रिपदासह अर्थमंत्रिपद मिळावं, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय?

महायुतीच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला सध्या निश्चित करण्यात आला आहे. यानुसार 21-12-10 अशापद्धतीने मंत्रीपदांची विभागणी होऊ शकते असे बोललं जात आहे. यात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रि‍पदे मिळू शकतात. त्यापाठोपाठ शिवसेनेला 10 ते 12 मंत्रि‍पदे आणि राष्ट्रवादीला 7-9 मंत्रीपदं मिळू शकतात, असे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आज मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक

दरम्यान काल दिल्लीतील बैठकीनंतर आता मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थितीत असणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रि‍पदावर चर्चा होणार आहे. तसेच अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा केली जाईल. त्यानंतर दोन दिवसांत निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यानंतर सत्तास्थापन आणि मुख्यमंत्रीपदावर अंतिम निर्णय होईल, असे बोललं जात आहे.