अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं? एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Nov 29, 2024 | 8:26 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थितीत होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बैठकीत काय घडलं याची सविस्तर माहिती दिली.

अमित शाहांसोबतच्या बैठकीत काय ठरलं? एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Follow us on

Maharashtra Government Formation : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना सध्या वेग आला आहे. राज्याच्या विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागांवर यश आलं. पण अद्याप सत्ता स्थापनेच्या पेचावर तोडगा निघालेला नाही. त्यातच काल रात्री दिल्लीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकीत महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्रि‍पदी कोण विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब केले. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बैठकीत काय घडलं याची सविस्तर माहिती दिली.

दिल्लीत रात्री काय घडलं?

अमित शाह यांच्या निवासस्थानी आज रात्री उशिरा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे हे उपस्थितीत होते. तर दुसरीकडे रात्री उशिरा एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळाहून थेट अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची बैठक सुरु होती. यानंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

या बैठकीनंतर अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस रात्री 3 वाजता मुंबईत दाखल झाले. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली. “आज आमची पहिली बैठक झाली. उद्या पुन्हा बैठक होईल. या बैठकीत महायुतीचा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा होईल. तसेच मंत्रिमंडळावरही चर्चा होईल. उद्या मुंबईत बैठक होईल. आमची बैठक सकारात्मक झाली. अमित शाह आणि जे.पी.नड्डांसोबत बैठक झाली. या बैठकीला आम्ही तिघेही उपस्थितीत होतो. आजच्या बैठकीत सरकार स्थापनेवर चर्चा झाली आहे. आमच्यात समन्वय आहे. मी कालच माझी भूमिका सांगितली”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारवर जनता खुश – एकनाथ शिंदे

“आम्ही सकारात्मक आहोत. सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री मी आहे सगळ्यांची काळजी मी घेतो आहे. लाडकी बहीण फेमस आहे लाडका भाऊ फेमस आहे. लाडकी बहीण महत्वाची योजना आहे. सरकारवर जनता खुश आहे”, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.