गृहमंत्रिपद-उपमुख्यमंत्रिपदावर आजच निघणार तोडगा, मुंबईत राजकीय घडामोडींना वेग

| Updated on: Dec 02, 2024 | 2:20 PM

आज मुंबईत महायुतीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपदावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गृहमंत्रिपद-उपमुख्यमंत्रिपदावर आजच निघणार तोडगा, मुंबईत राजकीय घडामोडींना वेग
Follow us on

Maharashtra CM Oath Taking Ceremony : महाराष्ट्रातील नवीन मुख्यमंत्र्‍यांचा शपथविधी सोहळा येत्या 5 डिसेंबरला पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार आहे. एकीकडे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असताना दुसरीकडे महायुतीत उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपदावरुन सुरु असलेला तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आज मुंबईत महायुतीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपदावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महायुतीत वादाची ठिणगी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल संध्याकाळी दरे गावातून मुंबईत परतले. यानंतर आज महायुतीतील भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार गटाची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्‍यांच्या शपथविधीबद्दल चर्चा केली जाणार आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रीपदाच्या केलेल्या मागणीवरही चर्चा केली जाणार आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर ठाम आहेत. तर भाजपकडून गृहमंत्रीपद दिले जाणार नाही, असे स्पष्टपण सांगण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. आजच्या महायुतीच्या बैठकीत याच वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

भाजपकडून गटनेता निवडीसाठी आज बैठक

तर दुसरीकडे आज भाजपचीही एक बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी भाजपच्या अनेक आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत मुंबईतील आमदारांना भाजप विधिमंडळ पक्ष बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, बंटी भांगडीया, किशोर जोरगेवार हे सध्या मुंबईत आहेत. तर नवनिर्वाचित आमदार करण देवतळे निरोप आल्यावर रवाना होणार आहेत. त्यासोबतच नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांना अद्याप बैठकीचा निरोप मिळालेला नाही. त्यामुळे ते सध्या मतदारसंघात आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेला १३ मंत्रिपद मिळणार?

तसेच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहे. या बैठकीत मंत्रिपदावरुन चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळात शिवसेना ज्येष्ठ आणि नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे बोललं जात आहे. महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला १३ मंत्रिपद मिळणार असल्याचे बोललं जात आहे.

‘या’ आधारावर मंत्रीपदं ठरणार

दरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून मेरीटवर मंत्रीपदे बहाल केली जाणार आहे. लोकसभेतील कामगिरी, आमदारांचा मंत्रीमंडळातील प्रेजंस, कुठलीही कांट्रोवर्सी नसलेले आमदार, सगळ्यांना सामावून घेण्याची कार्यपद्धती, पालकमंत्री पदाची कुवत या पाच मुद्द्यावरुन मंत्रिपदाचं खाते वाटप जाहीर करण्यात येणार आहे