Prasad Lad on Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच येत्या ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानात नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरे यांनी एक मोठी टीका केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल. “निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंच्या बाबतीत करेल”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता यावरुन भाजपच्या मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
“उद्धव ठाकरे यांचं आता उफाळलेलं प्रेम आधी उफाळले असते, तर एकनाथ शिंदे सोडून गेले नसते”, असा खोचक टोला भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी लगावला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्या देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अनेक बैठका पार पडत आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच बैठकीनंतर प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
“…तर एकनाथ शिंदे सोडून गेले नसते”
“आतापर्यंत ड्रमगेट ते मेनगेट आणि मेनगेट तू ड्रमगेटच्या बाहेर उद्धव ठाकरे गेलेले नाहीत. मुख्यमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात ते फक्त तीन वेळा गेले. फेसबुक लाईव्हवर त्यांनी सरकार चालवलं. आता उफाळलेलं प्रेम आधी उफाळले असते तर एकनाथ शिंदे सोडून गेले नसते. सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वाईट वागणूक दिली. म्हणून हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन आमदार बाहेर पडले. आता उरलेले आमदार बाहेर पडतील म्हणून हा केविलवाणा प्रयत्न आहे”, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी टीका केली.
यावेळी प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण दिले जाईल का, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले “त्यांना निमंत्रण दिले जाईल. येणे किंवा न येणे हे त्यांच्या वर आहे. कोत्या मनाचे लक्षण ते दाखवू शकतात”, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेना गोंजारेल. निवडणुकीत हेतू साध्य झाल्यानंतर भाजप जे करायचेय ते शिंदेंच्या बाबतीत करेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) आव आणून त्याखाली भाजपने वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या. आरएसएस फक्त पत्रकं वाटाण्यापुरती होती. सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेत एकनाथ शिंदे यांच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे. भाजपला मुंबई महानगरपालिका जिंकायची आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.