Rahul Jagtap Meet Ajit Pawar : महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या हालचाली वेगात सुरु आहेत. येत्या ५ डिसेंबरला महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा मुंबईत पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थितीत राहणार आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवारांनी शरद पवारांना एक मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निलंबित केलेले माजी आमदार राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली. आता शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार मानसिंग नाईक हे अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झाले आहेत. राहुल जगताप आणि मानसिंग नाईक यांच्या भेटीमुळे शरद पवार गटात खळबळ उडाली आहे. तसेच हे दोघेही अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकांना निकाल लागल्यानतंर अजित पवारांनी पडद्यामागून खेळी करण्यास सुरुवात केली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा प्लॅन बी यशस्वी होण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवारांनी निकालाच्या दिवसांपासून शरद पवार गटातील पराभूत आणि निवडून आलेल्या उमेदवारांना फोन करण्यास सुरुवात केली होती. अजित पवारांनी फोन केलेल्या दोन महत्त्वाच्या नेत्यांनी अजित पवारांशी भेटून चर्चा केली. राहुल जगताप आणि मानसिंग नाईक अशी या दोघांची नावे आहेत. राहुल जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी एकनिष्ठ राहिल होते. मात्र विधानसभेला त्यांचा पराभव झाला. तर मानसिंग नाईक हे शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत.
राहुल जगताप हे आज सकाळीच अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. यावेळी त्यांनी अजित पवारांसोबत बंद दाराआड चर्चा केली. यानंतर आता राहुल जगताप हे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राहुल जगताप हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत राहुल जगताप हे पक्षात प्रवेश करतील असे सांगितले जात आहे.
राहुल जगताप हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघातून शरद पवारांकडे तिकीट मागितलं होतं. मात्र जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाटेला गेला. त्यामुळे राहुल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली. पण ते पराभूत झाले. यानंतर पवार गटाने त्यांचे पक्षातून निलंबनही केले. आता लवकरच राहुल जगताप हे अजित पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा रंगलेली आहे.