मुंबई : राज्यातलं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) सत्तेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ यांच्यासारखे नेतेही देऊ शकले नाहीत, असा धक्का एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना (Shivsena) दिला आहे. सत्ता परिवर्तन आणि शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हाती घेतल्याने सत्तेच्या रिमोट कंट्रोलचा हातही बदलला आहे. महाराष्ट्राच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आता ठाकरे घराण्याकडून तो भाजपकडे गेला आहे. यात उद्धव ठाकरे यांनी आपले सरकार आणि मुख्यमंत्रीपद दोन्ही गमावले आहे. पक्षाचे दोन तृतीयांश आमदारही बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 रोजी स्थापन केलेला पक्ष आता ठाकरे घराण्याच्या पकडीतून निसटला आहे, अशाही राजकीय चर्चा सुरू आहेत. मात्र काही राजकीय विश्लेषक हे एकनाथ शिदेंना कठपुतळी मानतात. कारण शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवणारे भाजपच आहे.
शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही किंवा कोणतेही घटनात्मक पद भूषवले नाही. त्यांच्या पक्षाचे सरकार असताना सत्तेचा रिमोट त्यांच्याच हातात राहिला. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि शिवसेनेने सरकार स्थापन केले तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले असतील, पण सत्तेचा रिमोट मातोश्रीवर बाळ ठाकरेंच्या हातात होता.काळाचं चाक फिरल्यावर दोन दशकांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अशी उलथापालथ झाली की भाजपच्या पाठिंब्यावरच शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यामुळे साहजिकच आत्ताची राजकीय समीकरणं ही पूर्णपणे बदलली आहेत.
उद्धव ठाकरे यांना सत्तेवरून हटवल्याने देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय दबदबाही वाढला आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये भाजप किंगमेकर झाला असून या सत्ता बदलात फडणवीस यांनी सर्व सुत्रं पडद्यामागून फिरवली आहे.त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर दुहेरी आव्हान आहे.
2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपशी संबंध तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार तर स्थापन केले आणि मुख्यमंत्रीही झाले. विचाराने विरोधी पक्षांशी घरोबा करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात असतानाही मुख्यमंत्र्यांची खुर्ची काबीज करत त्यांनी त्या टीकेकडे दुर्लक्ष केले आणि हीच अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना महागात पडली, असेही अनेक राजकीय पंडितांचं मत आहे. हिंदुत्वाच्या अजेंड्यावरून आणि बाळासाहेब ठाकरेंच्या आदर्शांपासून शिवसेना दूर गेल्याचा आरोप करत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. शिवसेनेचे दोनतृतीयांश आमदार फोडून त्यांनी उद्धव ठाकरे यांचंच सरकार पाडलं.