मुंबई | 06 नोव्हेंबर 2023 : पुढच्या वर्षी देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका देखील होणार आहेत. या निवडणुकांच्या आधी आज सर्वच पक्षांसाठी महत्वाचा दिवस आहे. कारण, सर्वाच राजकीय पक्षांची आज लिटमस टेस्ट आहे. आज राज्यातील अडीच हजार ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागणार आहे. काल राज्यातील 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. 74% मतदान काल पार पडलं. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असेल. तुमच्या गावातील ग्रामपंचायत निकाल, गावखेड्यातील प्रत्येक अपडेट आज दिवसभर पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर…
नागपूर जिल्ह्यात 357 ग्रामपंचायती आणि पाच ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीचा कौल नेमका कुणाला आहे. याचा आज फैसला होणार आहे. नागपूर जिल्ह्यात 362 ग्रामपंचायतीसाठी 85 टक्के मतदान झालं. सरपंचपदाच्या 1186 आणि सदस्यपदाच्या 6882 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा आज फैसला होणार आहे. जिल्ह्यातील पाच लाख मतदारांचा कौल नेमका कुणाला, हे पाहणं महत्वाचं असेल. नागपूर जिल्ह्यात चंद्रशेखर बावनकुळे, सुनील केदार, अनिल देशमुख, आ. राजू पारवे, सलील देशमुख, आशिष देशमुख या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
पुणे जिल्ह्यात 49 सरपंचांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. तर 800 च्या आसपास सदस्यांच्या बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध सरपंचांमध्ये महायुतीचे 24 मविआचे 16 तर स्थानिक आघाडीचे 9 उमेदवार आहेत. तर ग्रामपंचायत बिनविरोध सदस्यांमध्ये महायुतीचे 485, मविआचे 335 तर इतर 129 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी होतेय. पुणे जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा त्यामुळे पणाला लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात काल चुरशीनं 85% मतदान झालं. आज तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. करवीर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतची मतमोजणी शासकीय गोदाम परिसरात होणार आहे. सकाळी आठ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात होईल. दह वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहेत.