चंद्रपूर – महाराष्ट्रात (Maharashtra) पुढचे चार दिवस उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मागच्या आठवड्यापासून तापमान अधिक आहे. अनेक जिल्ह्यात तर तापमानाचा पारा 40 अंशाच्यावर आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात मंगळवारी 43.4 अंश तापमान होते. त्यामु्ळे भारतातील सगळ्यात जास्त तापमान चंद्रपूरमध्ये असल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे तापमानाच्या बाबतीत चंद्रपूर जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अकोल्यात सुध्दा अधिक तापमान आहे. तिथे सुध्दा तापमान 43.1 अंशावर होते. अनेक जिल्ह्यात तापमानाची स्थिती 2 एप्रिलपर्यंत अशी राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
चंद्रपुरात पहिल्या वनव्याची नोंद
चंद्रपुर जिल्ह्याचं तापमान अधिक आहे. त्यातचं मंगळवारी सायंकाळच्या सुमारास इरई धरण क्षेत्रालगत आग लागली. लागलेली आग झपाट्याने पसरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर इरई धरण क्षेत्रालगत घटनास्थळी अनेक वनपथके दाखल झाली. खासगी शेतशिवार आणि व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागात आगीची धग असल्याची माहिती रात्री उशीरा मिळाली. आग विझवण्यासाठी वनविभागाकडून शर्तीचे प्रयत्न चालू होते. पण वाढत्या तापमानामुळे आगीने जोरात पेट घेतला आहे. त्यामुळे आग विझवताना अधिकाऱ्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. आग विझवण्यासाठी आधुनिक ब्लोअर यंत्र वन कर्मचारी वापर करीत आहे. अद्याप आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट झालेलं नाही. पण परिसरातील अज्ञात व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगावात उष्माघाताचा पहिला बळी
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तापमान अधिक असल्याने आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जळगावमध्ये शेतात काम करून घरी आल्यानंतर उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. जितेंद्र संजय माळी असं त्या शेतकऱ्यांचं नाव आहे. उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली. मंगळवारी जळगाव जिल्ह्यात तापमान 43 अंशावर होते. अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.