कोल्हापूरः कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्यातच काल कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी चिघळले. हे चालू असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी पुन्हा अक्कलकोट आणि सोलापूरवरही दावा केला. त्यामुळे कोल्हापूरातील ठाकरे गट आता आक्रमक होत त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्यावर निशाणा साधला आहे.
कोल्हापूरात आंदोलन करत त्यांनी कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसवर जय महाराष्ट्र लिहित बोमईंचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
मागील दोन दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमावादावरून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. त्यामुळे बेळगाव आणि निपाणी शेजारी असणाऱ्या कोल्हापूर शहरात याविरोधात वातावरण तापले आहे.
त्यामुळे आता ठाकरे गटाने आंदोलन छेडून कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त करून भाजप सरकारवरही निशाणा साधण्यात आला आहे.
बसवराज बोमई यांच्यावर निशाणा साधताना शिवेसेनेचे नेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.
बसवराज बोमई यांच्यामध्ये जर हिम्मल असेल तर त्यांनी जत माझं, अक्कलकोट माझं आणि सोलापूर माझं असं कोल्हापूरातील कावळानाक्याला येऊन सांगावे असा इशारा त्यांनी दिला आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र हा वाद प्रचंड तापला असून त्याचा परिणाम म्हणून आता कर्नाटकच्या बसला काळे फासून त्यावर जय महाराष्ट्र असं लिहिण्यात आले आहे.
त्यामुळे आता कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या बस बंद होणार असल्याचे दिसून येत आहे. या वादामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपकडून जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्याची टीकाही संजय पवार यांनी केली.