मुंबई: आज दिनांक 7 ऑक्टोबर 2022 जाणून घेणार आहोत राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्यात मान्सून रेंगाळण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसाबाबत अद्याप कुठलाच अंदाज नाही. दरवर्षी राज्यात 10 ऑक्टोबरला मान्सून परतीचा प्रवास सुरू होतो. मात्र यंदा राज्यातील मान्सून परतीचा प्रवास लांबण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. असा अंदाज पुणे वेधशाळेच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. गेले दोन तीन दिवस राज्याच्या काही भागात पाऊस झाला. या पावसाचा मोठा फटका पिकांना बसला आहे. या पावसामुळे बाजरी, सोयाबीन, कापसाचे नुकसान झाले आहे. त्यातच पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.