नवी मुंबई: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 12 ते 22 मार्च या कालावधीत पनवेलमध्ये रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. या काळात शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास पूर्णपणे बंद राहतील. केवळ दहावी आणि बारावीच्या शिकवणी वर्गांना परीक्षा जवळ आल्यामुळे अपवादात्मक परवानगी देण्यात आली आहे. तसेच 22 मार्चपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात कोणताही लग्नसमारंभ आयोजित करण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची गरज असेल.
खासगी आस्थापने रात्री दहा वाजेपर्यंत तर उपहारगृहे, रेस्टॉरंट, बार,कॅफे, डायनिंग हॉल अशा ठिकाणच्या सेवा 50 टक्के क्षमतेसह रात्री 11वाजेपर्यंत आणि मॉल्सहीत सर्व प्रकारची दुकाने रात्री 10 वाजेपर्यत सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.
10 मार्च 2020 रोजी पनवेल महापालिका क्षेत्रात पहिला कोरोनाचा रूग्ण सापडला होता. त्याला आता एक वर्ष पुर्ण झाले, गेल्या वर्षभरात मधल्या काळात कोरोनाच्या रूग्ण वाढीचा आलेख दररोज ३०० पर्यंत वरती जाऊन दररोज 25 पर्यंत खाली आला होता. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांमध्ये होणारी वाढ चिंताजनक आहे. महापालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहे.
मात्र, आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे वाढते रूग्ण ही चिंतेची बाब असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे कळकळीचे आवाहन आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही. मात्र कडक निर्बंध घालण्यात येणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्यान एकवेळ बंद राहणार आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत.
तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी असणार आहे. पुण्यात लॉकडाऊन होण्याची भूमिका कोणाचीही नाही, असे सौरभ राव म्हणाले.
संबंधित बातम्या :
Pune Lockdown Latest News : पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लागू करणार