महाराष्ट्र धुमसतोय, हिंसक घटनांच्या प्रार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी संचारबंदी, तुमच्या शहरातील स्थिती काय?

| Updated on: Nov 01, 2023 | 8:58 AM

Maratha Reservation : मराठा आंदोलन पेटलं, ठिकठिकाणी हिंसक घटना; ठिकठिकाणी संचारबंदीचा प्रशासनाचा निर्णय, तुमच्या शहरातील स्थिती काय? वाचा...

महाराष्ट्र धुमसतोय, हिंसक घटनांच्या प्रार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी संचारबंदी, तुमच्या शहरातील स्थिती काय?
Follow us on

मुंबई | 01 नोव्हेंबर 2023 : आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेलं मराठा आंदोलन सध्या अधिक तीव्र होत आहे. ठिकठिकाणी हिंसक घटना समोर येत आहेत. अशात राज्यात ठिकठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात आमदारांच्या घराला पेटवल्याच्या घटना समोर आल्या. त्यानंतर बीडमध्ये संचारबंदी करण्यात आली. आता 36 तासात संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. तर धाराशिवमध्ये संचारबंदी कायम आहे. नांदेड जिल्ह्यातही जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

बीडमध्ये संचारबंदी शिथिल

हिंसक घटनांनंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. पण आता ही संचारबंदी शिथिल करण्यात आलीये. जमावबंदी मात्र कायम आहे. तर बीड जिल्ह्याअंतर्गत एसटी अजूनही बंद राहणार आहे. तोडफोड झाल्यामुळे अनेक बसेसचं नुकसान झालं आहे. त्यामुळे आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. त्यामुळे खबरदारी म्हणून बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने आहे.

धाराशिवमध्ये संचारबंदी कायम

धाराशिव जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी आजही संचारबंदी आदेश लागू असणार आहे. आज शाळा, बस, बाजारपेठ बंद असणार असुन शाळेच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यातील 450 बसच्या 1 हजार 450 बस फेऱ्या रद्द केल्याने एसटी मंडळाला 50 लाखाचा फटका बसला आहे.

परभणी जिल्हाबंदची हाक

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज परत परभणी जिल्हाबंदची हाक देण्यात आलीय आहे. विविध मराठा समाजाकडून बंदचा निर्णय घेण्यात आलाय. व्यापारी प्रतिष्ठान आज ही बंद राहणार आहे. व्यापारी संघटनांनी आजच्या बंदला पाठिंबा दिलाय. शेतमाल वाहतूक ही बंद असणार आहे. काल बंदच्या दरम्यान एक दोन किरकोळ दगडफेकीच्या प्रकारानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आहेत. चोख असा बंदोबस्त राहणार आहे. काही ठिकाणी रस्ता रोको होणार होणार आहे. आजपासून कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आहे. त्याकडे संपूर्ण लक्ष राहणार आहे.

नांदेडमध्ये जमावबंदी

नांदेड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. उपोषण करण्यास, रॅली , मोर्चा काढण्यास नांदेडमध्ये बंदी घाण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

पुण्यात सतर्क राहण्याचे आदेश

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सतर्कतेचे आदेश देण्यात आलेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तर, लोकप्रतिनिधींच्या निवासस्थान परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. नवले पूल परिसरात झालेल्या आंदोलनानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. महामार्गांवर देखील गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकाची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये काय घडतंय?

पिंपरी चिंचवडमधून मराठवाडा, विदर्भातसह सोलापूर महामार्गावरील एसटी महामंडळाच्या शंभर पेक्षा अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात मराठा समाज आक्रमक झालाय. त्यातच उपोषण करते मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक झाली. या आंदोलनाचा फटका महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाला बसलेला दिसून येतोय.