राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घरावर दगडफेक; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक, राज्यभर आंदोलनं

| Updated on: Oct 30, 2023 | 1:45 PM

Maratha Reservation Update Manoj Jarange Patil Uposhan : गावखेड्यापासून ते राजधानी दिल्लीपर्यंत... आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर... कुठे बंदची हाक, कुठे बस जाळली तर कुठे रास्तारोको...; मराठा आरक्षणासाठी ठिकाठिकाणी आंदोलनं होत आहेत. राज्यातील आजची स्थिती काय आहे? वाचा...

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घरावर दगडफेक; आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक, राज्यभर आंदोलनं
Maratha Reservation mla home attack
Follow us on

जालना | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं मराठा समाजाचं आंदोलन अधिक व्यापक होत चाललं आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. गावगावात मोर्चे निघत आहेत. ठिकठिकाणी उपोषण केलं जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकी यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. प्रकाश सोळंकी हे माजलगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसंच आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.

राजधानी दिल्लीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन केलं जात आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने जंतर-मंतरवर आजपासून उपोषण करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीतही आंदोलन केलं जात आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर हे आंदोलक आक्रमक झाले. जंतर मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी असतानाही पोलिसांकडून नाहक त्रास दिला जात आहे, असा आरोप गंगाधर पाटील यांनी केला आहे.

जालन्यातील मंठा शहरात मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी शासकीय कार्यालयांना टाळं ठोकलं आहे.आंदोलक सर्वच कार्यालये बंद करण्याच्या मार्गावर आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून कार्यालयं बंद करण्यात आली आहेत. तहसिल, पंचायत समिती, नगर पंचायत, भूमी अभिलेख कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.

परभणी जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा ठप्प आहे. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी एसटी जाळपोळ आणि एसटी फोडण्याच्या घटना घडल्यानंतर परभणी जिल्ह्यात एसटीसेवा थांबवण्यात आली. सणासुदीच्या काळात अचानक एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांना नाहक त्रास झाला.

कोल्हापुरात सकल मराठा समाजाचे दसरा चौकात साखळी उपोषण सुरू आहे. यावेळी एक मराठा लाख मराठाची घोषणा देण्यात आली. आंदोलन स्थळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भेट दिली. यावेळी मराठा आरक्षणासाठी दोन दिवसाचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे. कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर उद्या मंत्रिमंडळ बैठकीत याविषयी चर्चा करण्याचं आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं.

धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील रानमळा गावात आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्यात आलं आहे. आरक्षण मिळावं यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे. गावाच्या वेशीवर बॅनर लावण्यात आलेत. गावातील 400 घरावर गावबंदीचे फलक चिटकवण्यात आले आहेत. गावात झाली बैठक गावातील सर्व समाजाचा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा आहे. पुढाऱ्यांनी विचारपूर्वक गावात प्रवेश करावा, असा इशारा तरुणांनी दिलाय.