औरंगाबाद : मराठवाड्याला मुसळधार पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे. दोन दिवसात तब्बल 31 जणांचा बळी गेल्याची माहिती आहे, तर पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 4 जणांचा मृत्यू झाला, तर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 7 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मराठवाड्यात 120 ते 150 पाळीव प्राण्यांचा मृत्यू झाला असून तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
औरंगाबादेत 07 सप्टेंबर रोजी दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र संध्याकाळी 7.10 वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाने रौद्र रुप धारण केलं होतं. त्यानंतर आकाशात विजांचा कडकडाट आणि अखंड पाऊसधारांचा वर्षाव हे चित्र तब्बल तासभर चाललं. या तासाभरात शहर आणि परिसरात पावसाचं जणू तांडव नृत्य सुरु होतं. सव्वा आठच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा कमी झाला. या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहरात तसेच जिल्ह्यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अंजना-पळशी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहू लागल्याने सांडव्यावरून पाणी वाहत होते. परिणामी अंजना नदीला पूर आला. ही नदी दुथडी भरून वाहू लागल्याने दहा गावांचा संपर्क तुटला होता. सोमवारी रात्रीपासून पिशोरला मुसळधार पाऊस होत असल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले. मंगळवारी आठवडी बाजार असल्याने गावांतील नागरिकांचे खूप हाल झाल्याचे वृत्त दै. लोकमध्ये प्रकाशित झाले आहे. या परिसरातील भारंबा, भारंबा तांडा, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, कोळंबी, जैतखेडा, साळेगाव, साळेगाव तांडा, पळशी बु., पळशी खुर्द आदी गावांचा पिशोरशी संपर्क तुटला आहे.
संदिपान भुमरेंकडून पाहणी
मागील अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने औरंगाबाद शहर तसेच जिल्ह्यात अक्षरश: हाहा:कार माजवला. औरंगाबादेत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची तसेच पिकाची पाहणी केली. त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असे त्यांनी आश्वासन दिले
संबंधित बातम्या :
औरंगाबादेत पावसाचा हाहा:कार, पिकं पाण्याखाली, मदतीसाठी प्रयत्न करणार, मंत्री भुमरे यांचे आश्वासन
अबब!!! ढगफुटीपेक्षाही भयंकर कालचा औरंगाबादचा पाऊस, वाचा पावसाच्या सरी किती तुफान वेगानं बरसल्या