अखेर वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडचे धाबे दणाणले गेले आहेत. राज्यातील जनता आणि देशमुख कुटुंबीयांच्या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली आहे. एसआयटीने कराडचा ताबा घेतला असून त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे. वाल्मिक कराडची संतोष देशमुख मर्डर प्रकरणातही चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे या चौकशीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. या प्रकरणात सक्रिय असलेले मनोज जरांगे पाटील अजून ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नवीन मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागणी केली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. राज्यात एवढी मोठी क्रूर हत्या झालेली असताना देशमुख यांच्याच कुटुंबाला आत्महत्या करण्याची वेळ येते यापेक्षा दुसरी गंभीर बाब नाही. त्यामुळे आरोपींना मकोका लावणं आवश्यक होतं. त्याला 302मध्ये घेणही आवश्यक होतं, असं मनोज जरांगे म्हणाले.
चार्जशीटमध्ये फेरफार नको
फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, खंडणीच्या गुन्ह्यातही मकोका असला पाहिजे. 302मध्येही मकोका असला पाहिजे. त्याने अनेक खूप प्रकार घडवून आणलेले आहेत. खूप आहेत. जागा बळकावणं, माऱ्यामाऱ्या करणं, चोऱ्या करणं, छेडछाडी करणं यात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्याला मकोका लागला पाहिजे, असं सांगतानाच तपास करताना चार्जशीटमध्ये हेराफेरी व्हायला नको. याची गृहमंत्रालयाने काळजी घ्यावी, अशी मागणीही मनोज जरांगे यांनी केली आहे.
केज कोर्टाकडे रवाना
दरम्यान, वाल्मिक कराडचा एसआयटीने तुरुंगातून ताबा घेतला आहे. वाल्मिकला हत्या आणि मकोकाच्या गुन्ह्यात कागदोपत्री अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. कागदोपत्री अटकेची कारवाई पूर्ण करून केज त्याला घेऊन एसआयटीची टीम केज कोर्टाकडे निघाली आहे. तगड्या पोलीस बंदोबस्तात वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. वाल्मिक कराडच्या रिमांडमुळे आज दुपारपर्यंत पक्षकारांना प्रवेश कोर्टात प्रवेश नाकारण्यात आला आहे. कोर्टाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे. मात्र फक्त वकील आणि कर्मचाऱ्यांनाच कोर्टात प्रवेश देण्यात येणार आहे. कोर्टात हजर केल्यानंतर वाल्मिक कराडला पुन्हा न्यायालयीन कोठडी सुनावली जाणार की पोलीस कोठडी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.