उद्यापासून अधिवेशन आणि संधी साधली… अजित पवार गटाच्या नेमकं मनात काय?

| Updated on: Jul 16, 2023 | 9:02 PM

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यावेळी शरद पवार यांचीच खेळी असल्याची चर्चा होती. मात्र, शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या निर्णयाला आमचे समर्थन नाही असे म्हणत चर्चाना पूर्णविराम दिला. मात्र, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार गटाने शरद पवार यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा त्या चर्चाना उधाण आले.

उद्यापासून अधिवेशन आणि संधी साधली... अजित पवार गटाच्या नेमकं मनात काय?
MAHARASHTRA MANSOON SESSION
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई | 16 जुलै 2023 : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. पूर्वी विरोधी पक्षात असलेले आता सत्ताधारी पक्षात गेल्यामुळे विरोधी पक्षात पडलेली फूट आणि सत्ताधाऱ्यांची एकजूट असे चित्र या अधिवेशनात पहायला मिळणार आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने विरोधी पक्षनेते कोण होणार याचीही उत्सुकता आहे. एरव्ही अधिवेशनात विविध मुद्द्यावरून विरोधी पक्ष हा सत्ताधाऱ्यांवर भारी पडत असल्याचे दिसत असायचे. मात्र, सभागृहाचा सार्वधिक अनुभव असणारे आमदारच आता सत्तापक्षात सामील झाले आहेत.

अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ तर धडाडती तोफ धनंजय मुंडे हे सत्तापक्षात गेल्यामुळे आता विरोधी पक्षाची मदार राष्ट्रवादीचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँगेसचे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सुनील प्रभू या आमदारांवर यांच्यावर असणार आहे.

हे सुद्धा वाचा

अशी साधली संधी

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यापूर्वी सत्तेत नव्याने सामील झालेल्या अजित पवार गटाची त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली. याच बैठकीमध्ये शरद पवार हे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे असल्याची कुणकूण लागली. त्यानंतर बैठक संपवून हे सगळे मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री, नेते यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार आमचे दैवत आहेत. ते इथे आल्याचे आम्हाला कळले. त्यामुळे ही संधी साधून त्यांची वेळ न मागता आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे पटेल म्हणाले.

अजित पवार यांच्या मनात नेमकं काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीचे मंत्री, आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला त्यांनी मार्गदर्शन केले. मंत्री म्हणून विधासनभेत उत्तर देताना जरा जपून. सध्या आपलेच सहकारी विरोधात आहेत. ते आपलेच आहेत. त्यामुळे एखाद्या गोष्टीला विरोध झाल्यास मंत्री म्हणून त्यांना सांभाळून घ्या अशा सूचना अजित पवार यांनी मंत्र्याना दिल्या. अजित पवार यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललं असा प्रश्न उपस्थित झालाय.