मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतोय. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस होतोय. मध्ये काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे दुबार पेरणीचं संकटही ओढावलेलं. मात्र आता सातत्याने होत असलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पावसाने काही जिल्ह्यांना चांगलंच झोडपून काढलंय. तर काही जिल्ह्यात अजूनही चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात येत्या काही दिवसात दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता आयएमडी अर्थात भारतीय हवामान विभागाने राज्यातील 4 जिल्ह्यांना आज (26 जुलै) रेड अलर्ट दिला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांना ऑरेन्ज आणि यलो अलर्टही दिला गेला आहे.
आयएमडीनुसार, कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी 2 असे एकूण 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेला आहे. त्यामुळे या 4 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
तसेच मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेन्ज अलर्ट दिलाय. त्यामुळे या 4 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
पालघर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज आहे.
रायगड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान आयएमडीने आज दिलेला पावसाचा इशारा पाहता प्रशासनही अलर्ट मोडवर आलं आहे. कोणतीही परिस्थिती ओढावल्यास मदतकार्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तसेच प्रशासनाने नागिरकांना या अशा स्थितीत गरज असेल, तरच घराबाहेर पडा, अन्यथा पडू नये, असं आवाहन केलं आहे.