नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात; अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलला, माहूर गडावरही अलोट गर्दी

| Updated on: Oct 03, 2024 | 8:22 AM

Maharashtra Navratra Utsav 2024 : नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. माहूरगडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी गर्दी झाली आहे.

नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात; अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलला, माहूर गडावरही अलोट गर्दी
नवरात्र उत्सवाला सुरुवात
Image Credit source: Instagram
Follow us on

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात आठ वाजून 40 मिनिटांनी घटस्थापना होणार आहे. अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भाविकांच्या गर्दीने अंबाबाई मंदिराचा परिसर फुलला आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांना देखील सुरुवात झाली आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सवास सुरवात झाली आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी झाली आहे. सप्तशृंगी देवीला आभूषण चढवले जात आहेत. गडावर देवीच्या पूजा विधीला सुरुवात झाली आहे.

माहूरगडावर भाविकांची गर्दी

नांदेडच्या माहूर गडावर नवरात्र महोत्सवाला सुरुवात आहे. रेणुका मातेच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. आज सकाळी शासकीय महापूजा पार पडली. दहा वाजता घटस्थापना होणार आहे. पुढील नऊ दिवस गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. माहूरगडावर रेणुका मातेचे आमदार बांगर यांनी दर्शन घेतलं. संतोष बांगर यांनी सपत्नीक दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पुन्हा महाराष्ट्राचे व्हावेत. महाराष्ट्राच्या राजगादीवर एकनाथ शिंदे विराजमान व्हावेत, अशा प्रार्थना रेणुका मातेच्या चरणी आमदार बांगर यांनी घातलं आहे.

अंबादास दानवेंच्या हस्ते कर्णपुरा देवी

छत्रपती संभाजीनगरची ग्रामदैवत कर्णपुरा देवीची आज स्थापना केली जात आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याहस्ते स्थापना होणार आहे. स्थापना करून अंबादास दानवे देवीचे आज आरती करणार आहेत. कर्णपुरा देवीची यात्रा संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. लाखो भाविक कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात. कर्णपुरा देवीची आज नवरात्रानिमित्त स्थापना होणार आहे.

अमरावतीच्या अंबादेवी मंदिरा शारदीय नवरात्री उत्सवाला पहाटेपासून प्रारंभ झाला आहे. अंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी विदर्भातील हजारो भाविक दाखल झाले आहेत. अमरावतीचे ग्रामदैवत म्हणून अंबा देवीची ओळख आहे. एकविरा देवीच्या मंदिरात देखील दर्शनासाठी भाविकांची नवरात्रीमध्ये गर्दी होत असते.

नवरात्रीनिमित्त रत्नागिरीमध्ये दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानचा हा अनोखा उपक्रम आहे. घटस्थापनेच्या दिवशी शहरातल्या विविध भागातून दुर्गा माता दौड निघते. पारंपारिक वेशभूषेमध्ये दुर्गा माता दौड निघते. घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत दौडच आयोजन केलं जातं. शहरातील 9 देवींचं दर्शन घेतलं जाणार आहे.