मुंबई । 18 जुलै 2023 : महाराष्ट्र राज्यातील डहाणू आणि तलासरी या सीमेवर हा वाद निर्माण झालेला आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सीमेवर वेवजी, गिरगाव, हिमानिया, झाई, सांभा, आच्छाड या आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायती आहेत. मात्र, या गावातील जमिनीवर शेजारच्या राज्याने अतिक्रमण केले आहे. यामुळे त्या गावांमध्ये आणि त्या राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा वाद वेळीच मिटवला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा विधानसभेत आमदार विनोद निकोल यांनी दिला.
महाराष्ट आणि कर्नाटक राज्यच्या सीमाभागाचा प्रश्न अदयाप प्रलंबित आहे. त्यातच आता शेजारच्या गुजरात राज्याने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरवात केली आहे असा आरोप आमदार निकोल यांनी केला. गुजरात राज्यातील उमरगाव गोवाडे, सूलसुंभा, सध्या, उमरगाव तालुक्यातील सूलसुंभा ग्रामपंचायतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील वेवजी ग्रामपंचायतमध्ये जवळ जवळ ५०० मीटर जागेवर अतिक्रमण केले आहे अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.
गुजरातमधील उमरगाव तालुक्यातील गोवाडे ग्रामपंचायतीने गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्यातील झाई गावातील काही रहिवाश्यांना नोटीस बजावली. यामध्ये तुमची घरे ही गुजरात राज्याच्या हद्दीत आहेत असे म्हटले होते. मात्र, त्या गावकऱ्यांचा ७/१२ हा महाराष्ट्रातील तलासरीतील वेवजी गावाच्या हद्दीतील आहे असे असताना गुजरात राज्य त्या गावांवर दावा कसा काय सांगू शकतात असा सवाल त्यांनी केला.
गुजरातमधील लोकांनी हे अतिक्रमण केले आहे. त्याचा वाद वाढत चालला असून दोन्ही गावे ही आदिवासी समाजाची आहेत. त्यामुळे त्यांचे सीमांकन निश्चित झालेले नाही. महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून तत्काळ हा प्रश्न मिटवावा, अशी मागणीही आमदार निकोले यांनी केली.
आमदार निकोले यांच्या या प्रश्न उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही गावाला भेट दिली असून पुढील आठवड्यामध्ये पुन्हा एकदा जिल्ह्याधिकारी, विभागीय आयुक्त यांना तेथे पाठवले जाईल. सीमावादाचा निर्माण झालेला हा प्रश्न सुटला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी लवकर बैठक घेण्यात येईल, असेहि मंत्री विखे पाटील म्हणाले.