उद्या फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी; कशी आहे आझाद मैदानावरील तयारी?

| Updated on: Dec 04, 2024 | 10:03 AM

Maharashtra New CM Government Formation : महायुती सरकारच्या शपथविधीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. उद्या केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. या शपथविधीची आझाद मैदानावर तयारी पूर्ण होत आली आहे. वाचा सविस्तर...

उद्या फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी; कशी आहे आझाद मैदानावरील तयारी?
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार
Image Credit source: ANI
Follow us on

महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. उद्या आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांचा हा मुंबई दौरा कमी कालावधीचा आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाली आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. तर आझाद मैदानावर या शपथविधीची तयारी आता जवळपास पूर्ण होत आहे. या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन झालेलं आहे.

मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी?

उद्या आझाद मैदानावर केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या वेळेमुळे कार्यक्रमाचं स्वरूप संक्षिप्त करण्यात आलं आहे. तर इतर मंत्र्यांचा शपथविधीदेखील लवकरच पार पडणार आहे. मुंबईतील राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे.

महायुती सरकारच्या या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरदार सुरू आहे. 30 हजार पेक्षा जास्त नागरिक बसतील. एवढा मोठा मंडप याठिकाणी बांधण्यात येत आहे. आझाद मैदानावर 100 बाय 100 चं मुख्य स्टेज उभारण्यात येत आहे. त्याच्या बाजूला दोन स्टेज बांधण्यात येत आहे. संपूर्ण स्टेज आणि मंडप भगवंमय करण्यात येत आहे. अतिशय मजबूत असा मंडप बांधण्यात येत आहे या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, आणि देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री या सोहळ्याचे साक्षीदार असणार आहेत.

आज दुपारी सत्तास्थापनेचा दावा केला जाणार

भाजप पक्ष निरीक्षक विधानभवनात थोड्याच वेळात पोहचणार आहेत. 10 वाजता भाजप विधीमंडळ पक्ष कार्यालयात चौथ्या मजल्यावर कोअर कमिटीची बैठक होणार आहे. तर 11 वाजता विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीसाठी बैठक होणार आहे. विधिमंडळ गटनेता निवडीनंतर भाजप प्रदेश पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपचे निरीक्षक महायुतीच्या नेत्यांना भेटतील. 3. 30 वाजता महायुतीचे नेते पक्ष निरीक्षक साडेतीन वाजता राज्यपालाकडे जाउन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.