राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार दुपारी नवी दिल्लीला जाणार आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निकालाबाबत विरोधकांनी आक्षेप घेतले आहेत. यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोधकांना ३ डिसेंबर ला चर्चेसाठी बोलवले आहे. निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात नाना पटोले यांचा समावेश केला आहे.
राज्यात एकीकडे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आज वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली होती. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यामुळे आज त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. आज ते ठाण्यातील निवासस्थानीच आराम करणार असल्याची माहिती.
हिंगोली- संतोष बांगर दुसऱ्यांदा आमदार झाल्याने कळमनुरी विधानसभेत महायुतीची विजयी मिरवणूक सुरू . हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या हिवरा पाटीपासून आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थिती मिरवणुकीला सुरुवात झाली.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार संतोष बांगर यांना 1 लाख 22 हजार 16 मते मिळाली आणि ते सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. याचा विजयाच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी विधानसभेतून विजय मिरवणूक काढण्यात आली आहे.
अमित शाह यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांच रिपोर्ट कार्ड मागवलं आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी संबंधित आमदाराचा परफॉर्मन्स कसा होता. त्या व्यक्तीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच इमानेइतबारे काम केलं होतं का? महायुती म्हणून आपल्या घटकपक्षातील आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती? केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे मंत्र्याने केला ? असे अनेक मुद्दे रिपोर्टकार्डमध्ये आहेत.
5 तारखेला होणाऱ्या शपथविधी संदर्भात मुंबईत भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली बैठक. आज दुपारी 02:00 वाजता ही बैठक होणार आहे.
मुंबई भाजपाचे सर्व आमदार,नगरसेवक,जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, महामंत्री, मंडल अध्यक्ष सर्व आघाड्यांचे अध्यक्ष सर्व उपस्थित राहणार. शपथविधी मोठ्या दिमाखात करण्यासंदर्भात नियोजन आढावा बैठक घेण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. राज्यात कोणतं पद घ्यायचं याचा निर्णय शिंदेच घेतील, त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल , शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी हे स्पष्ट केलं.
छत्रपती संभाजीनगर- दिल्ली, पंजाबप्रमाणे शाळेच्या वेळेत बदल करण्यासाठी विद्यार्थी, पालक संघटनेनं निवेदन दिलंय. थंडीमुळे शाळेच्या वेळा बदलण्यासाठी शिक्षण विभाग दोन दिवसांत पत्र देणार आहे. थंडीचा कडाका वाढल्यामुळे वेळेमध्ये बदल करायचा असल्यास संबंधित शाळांनी शिक्षण विभागाला कळवावं. त्यांना लगेच मान्यता देण्यात येईल. त्याविषयीचे पत्र येत्या दोन दिवसांत काढण्यात येणार आहे, असे प्राथमिक शिक्षण विभागाने म्हटले आहे. थंडी वाढल्यानंतर दिल्ली, पंजाबमध्ये शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येतात. जिल्हा प्रशासनाने त्याप्रमाणेच बदल करावेत, अशी मागणी विद्यार्थी, पालक संघटनेने केली आहे
महाराष्ट्र भाजपच्या निरीक्षकांची नावं आज दुपारी जाहीर केली जाणार आहेत. तर भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक 4 डिसेंबरला होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
नाशिक- शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार अपूर्व हिरे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. अपूर्व हिरे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. अपूर्व हिरे हे माजी आमदार असून त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
केंद्रीय नेतृत्वाकडून या मेरीटवर मंत्रीपदे बहाल केली जाणार असल्याची माहिती आहे. लोकसभेतील कामगिरी, आमदारांचा मंत्रिमंडळातील उपस्थिती, कुठलीही कॉन्ट्रोव्हर्सी नसलेले आमदार, सगळ्यांना सामावून घेण्याची कार्यपद्धती, पालकमंत्रीपदाची कुवत.. यावरून मंत्रिपदाचं खातं वाटप जाहीर होणार आहे.
आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. यानंतर संध्याकाळी भाजपचे निरीक्षक नेमलं जाण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्रातील महायुतीच्या तिन्ही नेत्यांची एकत्र बैठक होऊ शकते. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
भाजपचा गटनेता आज निवडला जाणार आहे. यासाठी भाजपच्या आमदारांना मुंबईत बैठकीसाठी येण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीत गटनेता निवडला जाणार आहे. मात्र अद्याप काही आमदारांना बैठकीचा निरोप आलेला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत जनतेमध्ये नाराजी असल्याची प्रतिक्रिया जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिली आहे. असे काही पोलिंग बूथ आहेत की जिथे आम्हाला काही मतचं मिळाली नाहीत आणि समोरच्या उमेदवाराला जास्त मतं मिळाली असं खासदार डॉ. काळे म्हणालेत. कायदेशीर पद्धतीने जे कामे तत्परतेने व्हायला पाहिजे ते त्या पद्धतीने होत नसल्याचं दिसून येत असल्याचं काळे यांनी म्हटलं आहे. संपूर्ण राज्यभरात लोकं उठाव करणार असल्याच जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी स्पष्ट केलंय.
एकनाथ शिंदे आज शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहे. या बैठकीत मंत्रिपदावरुन चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळात शिवसेना ज्येष्ठ आणि नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे बोललं जात आहे. महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला १३ मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एका गृहमंत्रिपदावर सरकार स्थापन होण्याचे अडलेले नाही, यामागे वेगळं काही कारण असू शकतं. गृहखात्याचा वापर करुन शिंदे गट भाजपच्या अंगावरही जाऊ शकतं. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं होतं. तेव्हा जर मूळ शिवसेनेला दिलं असतं तर ही वेळ आली नसती – संजय राऊत
देशातील धार्मिक एकता संपलेली आहे. हिंदूना सर्वात जास्त धोका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून आहे. संपूर्ण देशात दंगलीचा माहोल निर्माण झाला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली
ठाण्यात बार अँड रेस्टोरंटमध्ये वेटरला मारहाण करुन बार बाहेर धिंगाणा घालणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. ठाण्यातील सुर संगीत बार अँड रेस्टोरंटमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर बिल देण्यावरुन तिघांनी वेटरला मारहाण केली. रात्री साडेबारा वाजता हा प्रकार घडला. कपाळावर काचेचा ग्लास मारुन केल वेटरला जखमी करण्यात आले. हे तिघेही बार बाहेर देखील मद्यधुंद अवस्थेत राडा घालत होते.
पोलीस सदर ठिकाणी पोहोचताच पोलिसांवर देखील हात उचलला. पोलिसांना कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त केल्याने पोलिसांनी तिघांना दाखवला खाकीचा हिसका दाखवला. याप्रकरणी तीन जणांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वडापासून चेंबूरपर्यंत वाहनांच्या लागल्या लांबच्या लांब रांगा… शिवडीला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने जाताना वाहन खराब झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती… वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू, वाहतूक नियमित करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू… आठवड्याच्या पहिल्या सोमवारी वाहतूक कोंडीचा फटका मुंबईकरांना बसल्याने मुंबईकर हैराण…
दोषींवर कडक कारवाई करा… केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पोलिसांना सूचना, बुलढाण्यातील धाड गावात तणावपूर्ण शांतता… दोन दिवसांपूर्वी गावात मिरवणुकीदरम्यान 2 गटात राडा…
मुंबईकरांनो सावधान… वाढत्या प्रदूषणामुळे ‘वॉकिंग न्यूमोनिया’ वाढल्याची नोंद… निरोगी व्यक्तींनाही वॉकिंग न्यूमोनियाची लागण होत असल्याचं समोर… घसा खवखवणे, कमी दर्जाचा ताप, सततचा खोकला… ही लक्षणं…
बुलढाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर… मतं कमी पडली म्हणून गायकवाडांचे माझ्यावर आरोप… असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं आहे.
नाशिकमध्ये थंडीचा कडाका काही अंशी घटला आहे. कमाल आणि किमान तापमानात काही अंशानी वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला फारसा थंडीचा कडाका जाणवणार नाही. फेंगल वादळामुळे वाऱ्याचा पॅटर्न बदलला. राज्यासह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार आहे. नव्या चक्रीवादळाने हवेतील आर्द्रता बदलण्याची शक्यता असल्याची विभागाची माहिती देणार आहेत.
राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रावणी सुर्यवंशीने 3 तीन सुवर्ण पदक मिळवलं आहे. 68 व्या नॅशनल स्कूल गेम स्विमिंग अँड डायव्हिंग राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रावणी सूर्यवंशीची 3 सुवर्णपदकांची कमाई झाली आहे. गुजरातमधील राजकोटमध्ये सुरू असलेल्या 17 वर्ष वयोगटात श्रावणी सूर्यवंशीनेची डायव्हिंग स्पर्धेत हॅट्रिक मारली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तेलंगणा, पंजाब यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांचा समावेश आहे. राष्ट्रीय स्विमिंग – डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण 22 गोल्ड मेडलपैकी श्रावणीने तीन गोल्ड मेडल प्राप्त विजयाचा झेंडा करत रोवला आहे. मूळची सोलापूरची कन्या असणाऱ्या श्रावणीचे राज्यभरात कौतुक होत आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील लुईसवाडी निवासस्थानाबाहेर ‘आय लव्ह मुंबई’ चे बॅनर लागले आहेत. राहुल कनाल फाऊंडेशनच्या आय लव्ह मुंबईचे बॅनर वतीने लावण्यात आले आहेत. बॅनरवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. भाई, लहानसाठी काका, बहिणीसाठी लाडका भाऊ… तरुणांसाठी दादा… ज्येष्ठांसाठी आधार आणि समाजाचा कॉमन मॅन…हवाय आपल्या अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. राज्यात महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही मुख्यमंत्री पदासाठी कोणाचे नाव जाहीर झालेले नाही. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याचे जाहीर केले असले तरी गृहमंत्रिपदाबाबत ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. याच दरम्यान ठाण्यात लावलेला हा बॅनर शिंदेंच्या चाहत्यांमधील त्यांच्या नेतृत्वाविषयी असलेल्या अपेक्षांचे प्रतीक मानला जात आहे.या बॅनरची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीला राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दिल्लीच्या बैठकीनंतर मुंबईत परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबईत महायुतीची बैठक होणार असल्याची माहिती दिली होती. मात्र एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने शिंदे हे दरेगावी गेले होते. काल संध्याकाळी ते ठाण्याच्या निवासस्थानी परतले. यामुळे दोन दिवसापूर्वी होणारी बैठक आज होण्याची शक्यता असून दुपारनंतर या तिन्ही नेत्यांची बैठक होईल.
महाराष्ट्रात नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? हा प्रश्न महाराष्ट्रातील लोक विचारत आहेत. राजकीय वर्तुळासोबतच राज्यातील गावागावात हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. एकनाथ शिंदे हे दरेगावावरून परत आले आहेत. असं असताना आज महायुतीची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.