महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आज साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी गेले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत होणाऱ्या महायुतीच्या बैठका आता लांबणीवर पडल्या आहेत. शरद पवार आज पुण्यात आहेत. बाबा आढाव यांची ते भेट घेणार आहेत. मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे. आज किमान तापमान १८.२ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. – आज दिवसभर नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या (रविवारी) कमी दाबाने शहरात पाणीपुरवठा होणार आहे. याबाबतचे सर्व अपडेट्स तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. या सोबतच क्रीडा, मनोरंजन विश्वातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे दिवसभर आमचा हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
ज्येष्ठ कामगार नेते डॉ बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं आहे. बाबा आढाव यांचं गेल्या 2 दिवसांपासून पुण्यात ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरु होतं.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री यांची प्रकृती स्थिर नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिंदेच्या तपासणीसाठी डॉक्टरांचं पथक दाखल झालं आहे. शिंदे हे सध्या त्यांच्या मूळगावी साताऱ्यातील दरे इथे आहेत.
निकाल लागून ८ दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही आणि सरकारही बनवलं जात नाही. राज्याचा खोळंबा होतोय. मात्र महायुतीला काही देणंघेणं नाही, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत महायुतीवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांची एक्स पोस्ट
निवडणुकीनंतर #मविआ ला सरकार बनवण्याची वेळ आली असती तर विधानसभेची मुदत संपताच २६ नोव्हेंबर नंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लावून पडद्यामागून #महाशक्तीने सरकार चालवले असते…. पण आज निकाल लागून ८ दिवस उलटले तरी नेता निवडला जात नाही आणि सरकारही बनवलं जात नाही.. पण यांच्या खेळात…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 30, 2024
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं पुण्यात ईव्हीएमविरोधातील आत्मक्लेश आंदोलन सुरु आहे. बाबा आढाव यांची अजित पवार आणि इतर नेत्यांनी भेट घेतली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यासोबत बाबा आढाव पत्रकारांशी संवाद साधत आहेत. या निवडणुकीत सरकारी तिजोरीतून पैशांचं वाटप झालं, असं बाबा आढाव यांनी म्हटलं आहे. तसेच निवडणुकीत गडबड झाल्याचा संशयही बाबा आढाव यांनी व्यक्त केला आहे.
लोकसभेच्या वेळी इव्हीएम चांगले होते. आता विरोधक विधानसभेत ईव्हीएम विनाकारण खापर फोडत आहेत असा आरोप ज्येष्ठ समाज सेवक बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी केला आहे.
लाडकी बहिण योजना मध्य प्रदेश आणि कर्नाटकातही आहे, आम्ही ती लागू केल्याने आम्हाला मतदान जास्त झाले, पाच महिन्यात लोकांचे मत बदलले त्याला आम्ही काय करणार असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली तेव्हा केला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी विधानसभा निवडणूक निकालानंतर पुणे येथे आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. त्यास शरद पवार यांनी भेट दिल्यानंतर आता अजितदादांनी भेट दिली आहे.
इम्तियाज जलील यांच्या भेटीसाठी शेकडो नागरिक दाखल झाले आहेत. आदर्श बँकेतील असंख्य ठेवीदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर जमा झाले आहेत. इम्तियाज जलील यांच्या पराभवानंतर सांत्वन भेटीसाठी शेकडो नागरिक दाखल झाले आहेत.
धुळे शहर विधानसभा निवडणुकीत यंदा देखील वोट जिहाद झाल्याचा दावा भाजपाचे नवनियुक्त आमदार अग्रवाल यांनी केला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत वोट जिहाद झाला आहे. या निवडणुकीत विशिष्ट समाजाने एमआयएमच्या फारुख शहा यांना 90 टक्के मतदान केले ,मात्र इतर लोकांनी लोकसभेत झालेल्या पराभवाची कसर भरून काढत भूतो ना भविष्य एक लाख मताच्या पुढे मला मतदान करून विजयी केले.
सध्या ईव्हीएमवरून तापलेलं असताना हे मशीन सहज हॅक करता येतो असा दावा महादेव जानकर यांनी केला. त्यावर आता भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी थेट आव्हान दिले आहे. निवडणूक आयोगाने सर्व विरोधकांना एकत्र करावे आणि ईव्हीएम हॅक करणाऱ्यांना पाचारण करावे. जानकर यांनी ईव्हीएम हॅक करुन दाखवावे असे वक्तव्य दानवे यांनी केले.
जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा आणि आसपासच्या परिसरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि बोंडअळी रोगाच्या प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय.त्यामुळे परिसरात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.ऐन बोंड लागण्याच्या अवस्थेत अतिवृष्टीच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्यामुळे एक दोन वेचणी मध्येच खराटा होत असल्यामुळे धावडा येथील एका शेतकऱ्याने आपल्या 3 एकर क्षेत्रावरील कपाशी पिकावर ट्रॅक्टर द्वारे रोटावेटर फिरवत कपाशीचे पीक जमीनदोस्त केलय.
महाराष्ट्राला मुख्यमंत्री नकोय की यांना प्रदीर्घकाळ काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राहायचं आहे. आम्ही असतो तर इतक्यात त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली असती. निकाल लागून आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी गेला आहे. निकालावर लोक खुश नाहीत. स्वत: काळजीवाहू मुख्यमंत्री अमावस्येच्या निमित्ताने गावाला गेले आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेचे निमंत्रण देण्यात आले आहे. 76 लाख मतं कशी वाढली आणि संध्याकाळी ते रात्रीपर्यंत मताचा टक्का कसा वाढला असा सवाल काँग्रेसने केला होता. त्यावर आता आयोगाने हा पवित्रा घेतला आहे.
राज्यात महायुतीच्या सरकार स्थापनेपूर्वीच नाराजी नाट्य सुरू असल्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांच्या चर्चेवर आम्ही लक्ष देत नाही, असा दावा त्यांनी केला.
शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल केले पाहिजे. त्यांना आधी शिवसेना संपवली. त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी संपवली. आता उद्धव ठाकरेंना संपवले.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेसला चर्चेचं निमंत्रण दिलंय. 3 डिसेंबरला चर्चेला येण्याचं निमंत्रण आयोगाने पाठवलंय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील फेरफारच काँग्रेसने आरोप केलाय. त्यामुळे ही बैठक बोलवली आहे. सविस्तर वाचा…
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील निलसनी- पेडगाव शेतशिवारात वाघाच्या हल्ल्याची घटना घडली. वाघाच्या हल्ल्यात रेखाबाई मारोती येरमलवार (वय 55) यांचा मृत्यू झाला.
भाजपची गटनेता निवडणुसाठी ३ डिसेंबर रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शनिवारी साई दरबारी आले. यावेळी त्यांनी साई समाधीचे दर्शन घेतले. तसेच नवीन सरकार बाबत वक्तव्य केले. 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होणार नवीन सरकार स्थापन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“पाच तारखेपर्यंतचा वायदा तुम्ही करत आहात तोपर्यंत आमचे काळजीवाहू मुख्यमंत्री काय करतील सांगू शकणार नाही. त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खचलेलं आहे. त्यांचा चेहरा मावळलेला आहे, डोळ्यांत चमक दिसत नाही. तुम्ही मोदी शहा यांचे लाडके भाऊ राहिलेला नाहीत,” अशी टीका संजय राऊतांनी केली.
“मुख्यमंत्रिपद भाजपकडे गेलं तर गृहखातं आमच्याकडे असावं हीदेखील आमची मागणी राहणार आहे. गृहखातं आमच्याकडे असायला हवं, काहीच हरकत नाही,” अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली.
“२०१९ मध्ये सरकार स्थापन करायला १ महिना लागला. याला जबाबदार कोण होतं? सकाळच्या शपथविधी विसरले का, ते पाप आठवा. आठ दिवस उशिराने काही आभाळ कोसळलं नाही. विरोधकांच्या टीकेला आम्ही किंमत देत नाही. विरोधी पक्ष देखील राहिला नाही,” असं संजय शिरसाट म्हणाले.
“जय-पराजय हा निवडणूक प्रकियेचा भाग आहे. पण जनमत नसताना असे लोक लाख मतांनी निवडून येतात. असा निकाल लागणं म्हणजेच शेकडो उदाहरण आहे ज्यावरून ईव्हीएमवर प्रश्न निर्माण होत आहे. तुम्ही बॅलेटवर निवडणूक घ्या,” असं अंबादास दानवे म्हणाले.
“बाबा आढाव उपोषणाला बसले आहेत, आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. बाबा आढाव यांच्यासारख्या माणसाने भूमिका मांडली असताना तरी सरकारने याची दखल घावी. अन्यथा याचं जनआंदोलन केवळ राज्यभरात नाही तर देशभरात उभं राहिल,” असं अंबादास दानवे म्हणाले.
बाबा आढावा यांची उद्धव ठाकरे आज भेट आहेत. बाबा आढव यांचे गेल्या तीन दिवसांपासून आत्मक्लेष उपोषण सुरू आहे. ईव्हीएममध्ये घोटोळा झाल्या आरोप बाबा आढाव यांनी केला आहे. काही वेळापूर्वी शरद पवार यांनीही बाबा आढाव यांची भेट घेतली होती.
मुख्यमंत्री शिंदे यांचं मानसिक संतुलन बिघडलं अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली. मात्र त्या टीकेला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. मानसिक संतुलन कोणाचं बिघडलंय हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजलं, असा टोला शिरसाट यांनी लगावला.
मुख्यमंत्रीपदाबाबत मोदी, शाह निर्णय घेतील. वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल हे शिंदेंनी आधीच स्पष्ट केलं आहे – संजय शिरसाट यांनी नमूद केलं.
भाजप अजून मुख्यमंत्री का ठरवत नाही हे माहीत नाही. सरकार वाऱ्यावर सोडलेलं नाही, काम सुरू आहे. शिंदे अजून दोन दिवस गावी राहणार आहेत. त्यांना अजून काही वेगळा निर्णय घ्यायचा आहे असं समजू नका – संजय शिरसाट
महायुतीचा विजय खरा नाही. भाजप नाग आहे, जे सोबत येतात त्यांना डंख मारतात असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडलं.
76 लाख मतं कशी वाढली ? हरियाणाच्या निवडणुकीतही 14 लाख मतं वाढली होती. रांगा लावून रात्री 11.30 पर्यंत मतदान कुठे सुरू होतं ? असे अनेक सवाल विचारत संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
बीड – तपासणीसाठी डॉक्टरकडे गेलेल्या तरूणीची डॉक्टरने छेड काढल्याचा आरोप, परळीतील घटना. विनयभंग करणाऱ्या डॉक्टरविरोधात परळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्भूमीवर आज परळी बंदची हाक देण्यात आली असून आंदोलकांनी पोलिसांना निवेदनदेखील दिलं आहे.
निफाड तालुक्याचा किमान तापमानाचा पारा घसरला. राज्यात सर्वात नीचांकी किमान तापमानाची नोंद निफाड तालुक्यातील ओझर HAL येथे झाली असून तेथे 5.4 अंश सेल्सिअस किमान तापमान आहे.
तर कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडीत वाढ झाल्याने नागरिकांना हुडहुडी भरली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे विठ्ठल मंदिरात भजन किर्तन करत विठ्ठलाला घातलं साकडं… विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांकडून भजन करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत तर आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रिपद मिळावे यासाठी घालण्यात आलं साकडं… दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार झालेले सुभाष देशमुख यांनाही मंत्रिपद देण्यासाठी घालण्यात आलं साकडं…
मतदानाच्या दिवशीची शेवटच्या 2 तासातली आकडेवारी धक्कादायक… ईव्हीएम हॅक होऊ शकतं यांचं काहींनी प्रेझेंटेशन केलं… पण आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला… सत्ता, पैशांद्वारे निवडणूक यंत्रणाच हातात घेतली… असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
नाशिक आणि निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात नीच्चांकी तापमानाची नोंद… निफाडमध्ये किमान 7 अंश सेल्सिअस इतक्या नीच्चांकी तापमानाची नोंद तर नाशिकचा पारा 8.9 अंशावर… कडाक्याच्या थंडीने निफाड, नाशिककर गारठले… उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र गारठला… पुढचे काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज
खेड तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल झालेत. खेड तहसील कार्यालयातून बोगस रेशनिंग कार्ड दिले जात असून याप्रकरणी केलेल्या अर्ज मागे घेण्यासाठी दहा लाखांची मागणी करण्यात आली आहे. महेश नेहरे आणि सुनील नंदकर यांच्या विरोधात खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. खेड तहसीलदार यांच्या व्हाट्सअप वर मेसेज करून दहा लाखाची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
आज दिवसभर नाशिक शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर उद्या रविवारी कमी दाबाने शहरात पाणीपुरवठा होणार आहे. नाशिक मनपा व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याच्या ठिकाणी कामे होणार आहे. जलशुद्धीकरण पंपिंग स्टेशन येथे फ्लोमीटर , वॉलव्ह बसवण्याचे काम घेण्यात हाती येणार आहे. संपूर्ण दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असून महापालिकेने सहकार्य आव्हान करण्याचे केले आहे.
शरद पवार आज पुण्यातील निवासस्थानी मुक्कामी आहेत. थोड्याच वेळात शरद पवार निवासस्थानातून बाहेर पडतील. त्यानंतर भारतीय जैन संघटनेचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन पुण्यातील बिबेवाडी येथे पार पडतेय. त्या त्या ठिकाणी शरद पवार जातील. त्यानंतर पुण्यातील महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांचं आत्मक्लेष आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी शरद पवार भेट देणार आहेत.
‘ईव्हीएम’ वर संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रशांत जगताप यांच्यासह 6 उमेदवारांनी शुल्क भरलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या जिल्ह्यातील 11 उमेदवारांनी ईव्हीएम बाबत संशय व्यक्त केला आहे. पुन्हा मतमोजणीची पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये सहा उमेदवारांनी मतमोजणीसाठी आवश्यक असलेले शुल्क ही सरकारी तिजोरीत जमा केले आहे.