राज्यात पेट्रोल आणि डिझेल (Petrol-Diesel) लवकरच स्वस्त होणार आहे. इंधनावरील अबकारी करात (VAT)कपात करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सभागृहात केली. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर त्यांनी जनतेला अनोखी भेट दिली. पेट्रोल-डिझेलवरील अबकारी कर लवकरच कमी करण्यात येईल. कॅबिनेटच्या बैठकीत (Cabinet Meeting) या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) दोनवेळेस अबकारी करात कपात केली आहे. त्यानंतर आता भाजप पुरस्कृत सरकार महाराष्ट्रात विराजमान झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हे नवीन सरकार पण मूल्यवर्धित करात (VAT) कपात करण्याची घोषणा करेल असा अंदाज बांधल्या जात होता. अखेर तो अंदाज खरा ठरला. मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला. आता हा अबकारी कर किती रुपयांनी कमी होतो आणि देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त असलेले पेट्रोल-डिझेलच दर किती रुपयांनी कमी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या कॅबिनेटमध्ये याविषयीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सभागृहात सांगितले.
विश्वासदर्शक ठरावाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्वाच्या घोषणा सभागृहात केल्या. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांच्या विकास निधीची घोषणा त्यांनी केली आहे. हिरकणीचा इतिहास लोकांच्या स्मरणात रहावा आणि मातृत्वाचा हा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचावा यासाठी हिरकणी गावाचा विकास करण्यात येणार आहे. तर राज्यात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट लवकरच कमी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. व्हॅट कपातीचा हा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत मांडण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात ही इंधन दर कमी होतील आणि सर्वसामान्यांच्या खिश्यावरील भार हलका होईल अशी अपेक्षा आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र ही तिसरी महत्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीची भेट दते पेट्रोल, डिझेलवरील अबकारी कर कमी केला होता. भाजपशासित राज्यांनी हाच धागा पकडून कर कपात केली. त्यामुळे महाराष्ट्र सोडून या राज्यात इंधनाचे दर 15 ते 20 रुपयांनी कमी झाले होते. दोन महिन्यांपूर्वी पुन्हा केंद्र सरकारने अबकारी कर कमी केला. तर महाविकास आघाडी सरकारने कर कपात करण्यास नकार दिला होता. पण दबाव वाढल्यानंतर राज्य सरकारने अबकारी करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली होती. या निर्णयाचा राज्य शासनाच्या तिजोरीवर वर्षभरात 2500 कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याचे सरकारने सांगितले होते. केंद्र आणि राज्याने करात कपात केल्याने मे महिन्याच्या अखेरीस पेट्रोल 11 रुपये 58 पैशांनी स्वस्त झालं आहे. तर डिझेल 8 रुपये 44 पैशांनी स्वस्त झालं होतं.