प्रचाराचे काऊंटडाऊन सुरू, दोन दिवसात कुणाकुणाच्या सभा; गुलालासाठी कायपण !

| Updated on: Nov 16, 2024 | 8:11 AM

प्रचार संपायला अवघे तीन दिवस असून त्यापूर्वी राज्यात ठिकठिकाणी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत. मविआच्या नेत्यांनीही उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली असून काँग्रसचे प्रमुख नेते राहुल गांधी, तसेच प्रियांका गांधी यांची आज विविध ठिकाणी जाहीर सभा होणार आहे.

प्रचाराचे काऊंटडाऊन सुरू, दोन दिवसात कुणाकुणाच्या सभा; गुलालासाठी कायपण !
Image Credit source: social media
Follow us on

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील विधानसबा निवडणुकीसाठी आता अवघेत 4 दिवस उरले आहेत. 20 नोव्हेंबरला राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. 18 तारखेला प्रचाराचा अवधी संपत असून त्याच पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरात महायुती आणि मविआच्या नेत्यांनी प्रचाराचा, सभांचा धडाका लावला आहे. मविआचे नेते संपूर्ण राज्य पिंजून काढत असून आजही राज्यभरात महत्वाच्या नेत्यांचे दौरे, सभा होणार आहेत. प्रचार संपायला अवघे तीन दिवस असून त्यापूर्वी राज्यात ठिकठिकाणी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचे सर्वांचेच प्रयत्न आहेत. मविआच्या नेत्यांनीही उमेदवारांच्या प्रचारासाठी कंबर कसली असून काँग्रसचे प्रमुख नेते राहुल गांधी, तसेच प्रियांका गांधी यांची आज विविध ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 3 ठिकाणी, उद्धव ठाकरे यांच्याही मुंबीत 3 सभा होतील. कोणाकोणाचा आज कुठे काय कार्यक्रम जाणून घेऊया.

आज कोणाच्या कुठे सभा ?

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते श्री. राहुल गांधी यांची आज ( 16 नोव्हेंबर) दुपारू 12.30 वाजता दत्तापूर, धामणगाव रेल्वे, येथे जाहीर सभा होणार आहे. तर त्यानंतर दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी ते चंद्रपूरमधील चिमूर येथील नागरिकांशी सभेतून संवाद साधणार आहेत. तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस श्रीमती प्रियंका गांधी यांची आज शिर्डी तसेच कोल्हापूरमध्ये जाहीर सभा होणार आहे. प्रियंका गांधी या आज सकळी शिर्डीत येणार असून 11.30 च्या सुमारास त्या साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेणार असून त्यानंतर 12.15 च्या सुमारास त्यांची साकोरी ता. राहाता (शिर्डी विधानसभा) येथे जाहीर सभा होईल. संध्याकाळी 5 वाजता त्यांची कोल्हापूरमधील गांधी मैदानाता जाहीर सभा होणार आहे.

तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री मा. श्री. सिद्धरामय्या यांची आज सकाळी ११. १५ वा. पंढरपूर मध्ये जाहीर सभा होणार आहे.

मविआच्या उमेदवारांसाठी शरद पवार मैदानात

विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यापासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील मैदानात उतरले असून संपूर्ण राज्यभरात त्यांचे झंझावाती दौरे सुरू आहेत. काल शरद पवार हे इचलकरंजीत होते, तेथे 2019 च्या एक सभेची पुनरावृत्ती झाली. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २०१९ साली सातारा येथे शरद पवार यांची एक जाहीर सभा झाली होती. जी सभा आजही सगळ्यांच्या स्मरणात आणि चर्चेत आहे. सातारा येथे शरद पवार यांचं भाषण सुरू असतानाच मुसळधार पाऊस पडला होता. त्यावेळी शरद पवार यांनी आपलं भाषण भरपावसातही थांबवलं नव्हतं. त्याच सभेची पुनरावृत्ती काल इचलकरंजीमध्ये झाली. काल तेथील सभेदरम्यान पावसाने पुन्हा हजेरी लावली. मात्र कालही शरद पवार थांबले नाहीत. त्यांनी भर पावसात आपलं भाषण पूर्ण केलं. आजही शरद पवार यांच्या विविध ठिकाणी सभा होणार आहेत. आज त्यांची वाई, कोरेगाव आणि फलटणमध्ये सभा होईल.

तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी सभा होणार आहे. आज उद्धव ठाकरे हे डोंबिवली, कल्याण, आणि ठाण्यात जाहीर सभा घेऊन उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकंदरच विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं असून प्रचाराचा धुरळा दणक्यात उडणार आहे.

महायुतीचे नेतेही सज्ज

तर निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. अमित शाह  यांच्या उद्या नागपूरमध्ये दोन सभा पार पडणार आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून कोकणात त्यांच्या सभांचा धडाका असेल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये एकनाथ शिंदे यांच्या एकूण तीन सभा होतील.  दापोली, गुहागरमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून आज 12 वाजता दापोलीमध्ये, तर दुपारी 2 वाजता गुहागरमध्ये सभा होणार आहे.  दापोलीमध्ये योगेश कदम, तर गुहागरमध्ये राजेश बेंडल शिवसेनेचे उमेदवार असून दोघांसाठी मुख्यमंत्री जाहीर  सभा घेणार आहेत. आजच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार, कोणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.