मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांनाच चक्रावून सोडणारी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. महाराष्ट्रातच नाही, तर देशात सर्वत्र याची चर्चा आहे. सर्वसामान्यांनाही यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण, राजकारणात काहीही होऊ शकतं, हे यामुळे अधोरेखित झालं. विचारधारेपक्षा सत्ता महत्त्वाची असते, यावर शिक्कामोर्तब झालं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा हे परस्परविरोधी विचारधारेचे पक्ष. पण आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा तिघेही एकत्र मिळून सत्तेत आहेत.
राज्यातील या नव्या राजकीय समीकरणांमागे पुढच्यावर्षी होणारी लोकसभेची निवडणूक आहे. केंद्रातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपाला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा जिंकायच्या आहेत. उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहेत. महाराष्ट्रातून 40 पेक्षा जास्त जागा जिंकण्याच भाजपाच उद्दिष्टय आहे. त्यासाठीच ही नवीन राजकीय समीकरणाची जुळवाजुळव भाजपाने केली आहे.
शिंदे गट नाराज
अजित पवार हे आमदार, नेत्यांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे निश्चित भाजपाची ताकत वाढली आहे. महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. पण अजित पवारांच्या येण्याने स्थानिक पातळीवर अनेक पेच निर्माण झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर शिंदे गट नाराज असल्याची माहीती आहे.
म्हणूनच बंड केलं होतं
महत्त्वाची खाती राष्ट्रवादी आणि भाजपकडे गेल्याने शिंदे गटाचे नेते नाराज आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेही आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.अजित पवारांच्या निधी वाटपाच्या फॉर्मुल्याला वैतागून शिंदेंची साथ देणारे नेते लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता बोलली जात आहे. वर्षभरापूर्वी शिवसेनेच्या 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलं.
आमदार अस्वस्थ आहेत
त्यावेळी पक्ष सोडताना बहुसंख्य शिवसेना आमदारांनी मविआ सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी निधी उपलब्ध करुन दिला नाही. त्यांनी भेदभाव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकत माप दिलं असा आरोप केला होता. आता तेच अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची साथ देणारे आमदार अस्वस्थ झाले आहेत.
करियर संपुष्टात आणण्याची भिती
अर्थ मंत्रालय अजित पवारांकडे जाणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेते अस्वस्थ आहेत. अजित पवार हे शिंदे गटातील आमदारांचे करियर संपुष्टात आणतील, अशी भीती नेत्यांनी शिंदेंकडे व्यक्त केली. शिंदे आणि फडणवीस याबाबात तोडगा काढणार असल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास या बद्दल चर्चा झाली.