ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी पूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते. त्यांच्या सोबत 20 आमदारही होते, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महायुतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आडून बसले होते, त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा भाजपचा प्लान होता, असे संकेतच राऊत यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी पालकमंत्रीपदाची घोषणा केली आहे. आपल्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ नाही पडल्याने अनेक मंत्री नाराज आहेत. रायगडमध्ये तर भरत गोगावले यांच्या समर्थकांनी जाळपोळही सुरू केली आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावात गेले आहेत. शिंदे महायुती सरकारवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरून संजय राऊत यांनी शिंदे यांना खोचक टोले लगावले आहेत. नाराजीचं कारण राज्याला कळलं पाहिजे. लहान मूल रुसावं आणि कोपऱ्यात जाऊन बसावं तसा हा प्रकार आहे. पण नाराजीचं कारण नक्की काय आहे? पद, पैसा, प्रतिष्ठा, खंडणी… नेमकं काय आहे? कळलं पाहिजे आम्हाला, असं संजय राऊत म्हणाले.
शिंदे सावध झाले आणि…
राज्यात आणि शिंदे गटात नवा उदय होणार होता, असं सांगितलं जात आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे, असं संजय राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. उदय सामंताचं नाव घ्या ना. मुख्यमंत्री फडणवीस हे उदय सामंत यांना दावोसला घेऊन गेले आहेत. सरकार स्थापन होण्याच्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे रुसून बसले होते. त्यावेळी उदय सामंत यांच्यासोबत माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार होते. तेव्हाच हा उदय होणार होता. तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं. पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली, असं सांगतानाच भाजपवाले सर्व पक्ष फोडतील… महाराष्ट्रात शिंदे गट फोडतील, अजित पवार गटही फोडतील. फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आणि राजकारण आहे, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
काँग्रेस कुठे आहे?
भाजपने उद्धव ठाकरेंना संपवले. तसं एकनाथ शिंदे यांना संपवून नवा उदय होईल, असं काँग्रेसने म्हटलं होतं. काँग्रेसचाही राऊत यांनी समाचार घेतला. काँग्रेस काय सांगते? उद्धव ठाकरेंना संपवून… मुळात उद्धव ठाकरे संपलेले नाही. त्या काळात बाळासाहेब ठाकरेंना संपवण्याच्याही वल्गना झाल्या. आम्ही सर्वांना पुरून उरलो. उद्धव ठाकरे हे संपवण्याची भाषा काँग्रेसवाले करत आहेत. संपले. तुम्ही कुठे आहात? तुम्ही कुठे आहात? शिवसेना संपली नाही. संपणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच आम्ही उसळी घेऊ. भाजपची ही कुटनीती आहे. याला संपव, त्याला संपव. हा पक्ष विकत घे, तो पक्ष विकत घे. एकनाथ शिंदेंच्या भविष्यातही तेच आहे, जे त्यांनी शिवसेनेबाबत केलं. भाजप, मोदी, शाह कुणालाच सोडत नाही. विशेषत: जे त्यांचे सख्खे आहेत, जे सोबत आहेत. त्यांना मोदी आणि शाह सोडत नाही. सर्वांशी त्यांची ठगगिरी सुरू असते, असा हल्लाबोलही त्यांनी केला.