महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण होणार? भाजप लवकरच ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता

| Updated on: Dec 11, 2024 | 3:23 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता लवकरच भाजप ऑपरेशन लोटस सुरु करणार आहे. महाविकासआघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण होणार? भाजप लवकरच ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता
महायुती
Follow us on

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले. त्यामुळे भाजप महायुतीने सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे विराजमान झाले. त्यातच आता महायुतीकडून मोठा गेम केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप महाविकासाआघाडीला जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. महाविकासआघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे बोललं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता लवकरच भाजप ऑपरेशन लोटस सुरु करणार आहे. महाविकासआघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाजप महाविकासआघाडीला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

अनेक खासदार संपर्कात असल्याचा नरेश म्हस्केंचा दावा

आता भाजपच्या संपर्कात असलेले खासदार कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “अनेक खासदार, आमदार आमच्या आणि भाजपच्या संपर्कात आहेत. विरोधी पक्षात जे सुरू आहे त्याला त्यांचे खासदार कंटाळले आहेत. जनाधार महायुतीच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरच काय ते समजेल”, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले.

…तर त्यांचे स्वागत नक्कीच करु – अर्जुन खोतकर

तसेच अर्जुन खोतकर यांनीही खासदार येत असतील तर स्वागत आहे, असे म्हटले आहे. लोकप्रतिनिधी जे निवडून आले आहेत, त्यांना जनतेच्या कामांसाठी सजग राहावं लागतं. त्यामुळे काम कोण करू शकतं, तर सत्ताधारी करू शकतात. त्यामुळे शिंदे, फडणवीस यांच्याकडे खासदार येत आहेत. ते आले तर त्यांचे स्वागत नक्कीच करु अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संजय शिरसाट काय म्हणाले?

त्यासोबतच संजय शिरसाट यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली. विरोधात राहून विरोधक काय करणार? कारण सत्ता आमची आहे. इतके आमदार आहेत आणि विकास कामांमध्ये अडथळा येऊ नये या भावनेतून प्रत्येक आमदाराला वाटते की आपण सरकार सोबत जावं. आपल्या मतदारसंघाचे काम करून घ्यावे आणि त्यामुळे बरेचशे नेते, खासदार, आमदार आमच्या देखील संपर्क आहेत. भाजपाच्याही संपर्कात आहे आणि येत्या दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल, असे सूचक विधान संजय शिरसाट यांनी केले.