मुंबई | 19 जुलै 2023 : राज्यात दमदार पाऊस बरसतोय. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय. मुंबईसह राज्यातील विविध भागात धोधो पाऊस कोसळतोय. लोणावळ्यात सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस कोसळतोय. मात्र तरिही लोणावळ्यातील नागरिकांना एक चिंता सतावते आहे. तर रत्नागिरीतील चिपळूणमध्येही जोरदार पाऊस पडतोय. वाशिष्टी नदीलाही पूर आलाय. भंडारा, गोंदिया या भागातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे.
पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील सलग दिवशी विक्रमी पाऊस कोसळतोय. गेल्या 24 तासांत इथं तब्बल 220 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर 48 तासांत तब्बल 434 मिमी पाऊस कोसळला आहे. असं असलं तरी यंदा आत्तापर्यंत झालेला पाऊल हा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2592 मिमी पाऊस बरसला होता. यंदा मात्र केवळ 1744 मिमी इतकाच पाऊस कोसळला आहे. जी चिंतेची बाब आहे.
वसई-विरार, नालासोपारा भागातही जोरदार पाऊस सुरूच आहे. रात्रभर जोरदार पाऊस पडत नाल्यातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शहरातील मुख्य रस्त्याच्या काही सकल भागात पाणी साचलं आहे. शहरातील सर्व जनजीवन सुरळीत असून, वाहतूक व्यवस्थाही सुरळीत सुरू आहे. पावसाच्या संतातधारेमुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. मध्यरात्री 12 वाजल्यापासून विरार, नालासोपा-याची लाईट बंद आहे. आभाळ पूर्णपणे काळेकुट्ट असून आज दिवसभर जोरदार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाशिष्टी नदीला पूर आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवनदीनेही धोक्याची पातळी ओलांडली होती. नगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला होता. चिपळूण शहरातील सखल भागांमध्ये पाणी साठलं आहे. तर पुढील चार दिवसात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
चंद्रपूर शहरात काल तब्बल 260 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पुर्वी 4 जुलै 2006 मध्ये 230 मिमी पाऊस झाला होता. या पावसामुळे चंद्रपूर शहरातील मच्छी नाला परिसर, आझाद बगीचा आणि बिनबा गेट परिसरात मोठया प्रमाणात पाणी साचलं होतं.
दुपारी 4:30 पासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने पावसाचं पाणी उतरलं आहे. मात्र हवामान खात्याने आज देखील चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट दिल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सध्या तरी कुठेही पूर परिस्थिती नाही.
भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. भंडाऱ्यात जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह हजेरी लावलेल्या पावसात वीज पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज आपत्ती व्यवस्थापनानं वर्तविला आहे.नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. गोंदिया जिल्हा हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सध्या पूर परिस्थिती नियंत्रणात आहे.