कोल्हापूर | 19 जुलै 2023 : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून सलग पाऊस पडतोय. अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. काही ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळतंय. तर काही भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. कोकणाला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालाय. अशात कोल्हापूरमध्येही जोरदार पाऊस कोसळतोय. अशात कोल्हापूरातील 76 गावांना भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. तर पुण्यात डेंग्युच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
कोल्हापूर शहर आणि परिसरात पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. कसबा बावडा इथला राजाराम बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. अपेक्षित पाऊस बरसत असल्याने कोल्हापूरकर सुखावले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील 76 गावांना भूस्खलनाचा धोका आहे. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रशासनाला यादी सादर केली आहे. राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात गावांवा सर्वाधिक भूस्खलनाचा धोका असल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित गावांमधील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. या गावातील ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय. झाडेगाव गावात अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. गावात दोन ते तीन फुटांवर पाणी पाहायला मिळतंय. झाडेगावाजवळ असलेल्या नाल्याला पुर आल्याने नांदुरा जळगाव जामोद बुऱ्हाणपूर मार्ग पाण्याखाली गेला आहे. तीन तासांपासून या मार्गावरची वाहतूक ठप्प आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा धोका संभवतो आहे. मागच्या काही दिवसात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे वशिष्ठी नदीला पूर आला आहे. अशात चिपळूणकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्याकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे परिपत्रक देखील काढण्यात आलं आहे. सावित्री, कुंडा, पात्रगंगा, नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.
रायगडच्या उरणमध्येही जोरदार पाऊस कोसळतोय. उरणच्या चिरनेरमध्ये रात्रीपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. पाणी घरात शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झालंय.
मागच्या काही दिवसांपासून पुण्यातही जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे पुणे शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे. डेंग्यूच्या डास उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या 547 जणांना पालिकेने नोटीस दिली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 23 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. सध्या पुणे शहरात सध्या 582 डेंग्यूचे संशयित रुग्ण आहेत. तर 33 जणांना डेंग्यूची प्रत्यक्ष लागण झाली आहे.