सध्या राज्यात अपघातांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. आज बुलढाण्यात झालेल्या दोन अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता भंडाऱ्यात मोठी शोककळा पसरली आहे. लग्नकार्यासाठी सासुरवाडीत आलेल्या जावयाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. राहुल वसंतराव मीसार (38) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ते चंद्रपुरातील पिंपळगाव भोसले येथील रहिवाशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवारी रात्री ८ च्या सुमारास भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील सावरगाव फाट्यासमोर एक भीषण अपघात झाला. लाखांदूर तालुक्यातील आथली येथील सासुरवाडीत लग्नकार्यासाठी आलेल्या जावयाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. लाखांदूरजवळील सावरगाव फाट्यासमोर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही
राहुल मिसार यांची लाखांदूर तालुक्यातील आथली या ठिकाणी सासुरवाडी आहे. ते प्रेमराज ठाकरे यांचे जावई आहेत. प्रेमराज ठाकरे यांच्या लहान मुलीचे आज मंगळवारी (२५ मार्च) लग्न होते. सोमवारी (२४ मार्च) हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी सोमवारी रात्री ७.३० वाजता राहुल मिसार हे आथलीवरून स्कुटीने लाखांदूरला येत होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या वाहनाला धडक देताच अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार झाला. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूरमधील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र जावयाच्या मृत्यूने सासुरवाडीत शोककळा पसरली आहे.
तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा शेंदुर्जन येथील एका युवकाचा रिसोड जवळ भीषण अपघात झाला. माधव दिगंबर नालेगावकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आपल्या एका नातेवाईकाच्या लग्न समारंभात गेला होता. तो त्याच्या दुचाकीने लग्न समारंभाच्या ठिकाणी आला होता. लग्नसमारंभात आनंद साजरा केल्यानंतर तो घरी येण्यासाठी निघाला. आपल्या दुचाकीने परत येत असताना विठ्ठल आळसा फाट्यावर समोरासमोर मोटरसायकल आणि एक चार चाकी वाहनाची जबर धडक झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.