निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 111 पोलिसांच्या तातडीने बदल्या

| Updated on: Oct 06, 2024 | 11:23 AM

मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत. यापैकी सर्वाधिक अधिकाऱ्यांची ठाणे जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 111 पोलिसांच्या तातडीने बदल्या
Follow us on

Maharashtra 111 Police transfer : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने 3 दिवस महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्याच्या शेवटी निवडणूक आयोगाने मुंबईत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशी सूचना दिली होती. आता राज्य सरकारने या सूचनेचे पालन करत तब्बल 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 111 पोलीस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक अशा पोलिसांचा समावेश आहे. यापैकी 11 पोलीस निरीक्षकांची बदली मुंबईत करण्यात आली आहे. तर मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या मुंबईबाहेर करण्यात आल्या आहेत. यापैकी सर्वाधिक अधिकाऱ्यांची ठाणे जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

‘या’ पोलिस अधिकाऱ्यांची बदली

त्यात प्रवीण दत्ताराम राणे, रवींद्र परमेश्‍वर अडाणे, बळवंत व्यकंट देशमुख, निलेश सिताराम बागुल, संजय सदाशिव मराठे, सुनील दत्ताराम जाधव, रुता शंशाक नेमलेकर, हर्षवर्धन यशवंतराव गुंड, हेमंत सहदेव गुरव, मनिषा अजीत शिर्के, इरफान इब्राहिम शेख, संध्याराणी शिवाजीराव भोसले, मथुरा नितीनकुमार पाटील, उषा अशोक बाबर, गणेश बाळासाहेब पवार, जगदीश पांडुरंग देशमुख, जयवंत श्याम शिंदे यांचा समावेश आहे.

याशिवाय राजीव शिवाजीराव चव्हाण, राजेश रामचंद्र शिंदे, संतोष जगन्नाथ माने, अनधा अशोक सातवसे, संजय थानसिंग चव्हाण, तानाजी सहदेव खाडे यांची मुंबई लोहमार्ग पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तर प्रमोद तावडे यांची मिरा – भाईंदर – वसई – विरार आणि विक्रम साहेबराव बनसोडे, राजेंद्र श्रीमनधर काणे यांची रत्नागिरी जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

तसेच बिलाल अहमद अमीरुद्दीन शेख, सचिन शिवाजी शिर्के, जयश्री धनश्याम बागुल – भोपळे, भास्कर दत्तात्रय कदम, विनायक विलास पाटील, विशाल विलास पाटील यांची पिंपरी – चिंचवडमध्ये बदली केली आहे. तर जयश्री जितेंद्र गजभिये, अजय भगवान क्षीरसागर यांची नागरी हक्क संरक्षण विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच मंगेश लक्ष्मण हांडे, अमर नामदेव काळंगे, अब्दुल रौफ गनी शेख, राणी लक्ष्मण पुरी, अश्‍विनी बबन ननावरे, राहुल विरसिंग गौड, राजेंद्र भाऊराव पन्हाळे, शशिकांत दादू जगदाळे यांची पुण्यात बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

मुंबई पोलीस दलात 11 नवे अधिकारी

मुंबई पोलीस दलाला 11 नवे अधिकारीही मिळाले आहेत. यात शहाजी नारायण पवार (सोलापूर), संजय पंडित पाटील, कैलास दादाभाऊ डोंगरे, जनार्दन सुभाष परबकर (रायगड), वैभव कांतीनाथ शिंगारे, गिरीश गणपत बने, मालोजी बापूसाहेब शिंदे (ठाणे), अनिल भाऊराव पाटील (नंदूरबार), संजय पांडुरंग पाटील (सांगली – पोलीस प्रशिक्षण केंद्र) आणि गजानन दत्तात्रय पवार (गुन्हे अन्वेषण विभाग) या अधिकाऱ्यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे.

दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रासह इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात 3 वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते.